Pakistan Defence Minister Khawaja Asif criticizes US over Strait of Hormuz priorities in the ongoing Middle East crisis : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अजूनही सुरूच आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी व्हाव्यात यासाठी मित्र राष्ट्रांकडून मध्यस्थीचे प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी युद्धाचा उद्देश बदलत जात असल्यावरून अमेरिकेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. आता संपूर्ण चर्चा ही फक्त होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यावर केंद्रित असल्याचे दिसून येत असल्याचे आसिफ म्हणाले आहेत.

“युद्धाचे उद्दिष्ट आता होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याकडे वळल्याचे दिसून येते, जी की युद्ध होण्यापूर्वी खुलीच होती,” असे ख्वाजा आसिफ यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक व्यापारासाठी एक अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे या मार्गात अडथळा आल्याने जागतिक ऊर्जा पुरवठ्यात समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे अनेक देशांमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत.

पाकिस्तानकडून मध्यस्थीची ऑफर

मध्यपूर्वेतील युद्धाचा चौथा आठवडा सुरू आहे. यादरम्यान पाकिस्तानने अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जर दोन्ही देश तयार असतील तर युद्धविरामाच्या चर्चांचे यजमानपद भूषवण्याची पाकिस्तानने तयारी दर्शवली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यानी एक्सवर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली होती. “मध्य पूर्वेतील युद्ध संपवण्यासाठी आणि प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेले चर्चेच्या प्रयत्नांचे पाकिस्तान स्वागत करतो आणि त्याला पूर्ण पाठिंबा देतो.”

होर्मुझची सामुद्रधुनी भारतासाठी खुली

अमेरिका-इस्रायलविरुद्ध इराण संघर्ष सुरु झाल्यापासून बंद करण्यात आलेली होर्मुझ सामुद्रधुनी भारतासह इतर काही देशांसाठी खुली करण्यात आली आहे. स्वत: इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी आज (गुरुवारी) याबाबत माहिती दिली.

“आम्ही भारत, पाकिस्तान, चीन, इराक, रशियासह मित्रराष्ट्रांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करत आहोत”, अशी माहिती इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी दिली आहे. मुंबईमधील इराणच्या वाणिज्य दूतावासाने याबाबत अराघची यांच्या फोटोसह माहिती दिली आहे.