Pakistan Defence Minister Khawaja Asif faces criticism for deleting his post regarding the Israel-Lebanon war : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमुळे पाकिस्तान आणि इस्रायल यांच्यात वाद पेटल्याचे पाहायला मिळाले. आसिफ यांनी आपल्या पोस्टमध्ये लेबनॉनमध्ये इस्रायल करत असलेल्या हल्ल्यांवरून जोरदार टीका केली होती. मात्र पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांवर आपली पोस्ट डिलिट करण्याची नामुष्की ओढावली आहे.

आमेरिका आणि इराण यांच्यातल संघर्षात मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानच्या भूमिकेवर इस्रायलने शुक्रवारी तीव्र शब्दात टीका केली. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने आसिफ यांचे विधानावर प्रतिक्रिया देताना, इस्रायलच्या विनाशाचे आवाहन करणारे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान संतापजनक असल्याचे म्हटले आहे. “हे असे विधान नाही जे कोणत्याही सरकारकडून करण्यात आले तरी खपवून घेतले जाऊ शकेल, विशेषतः अशा सरकारकडून जे शांततेसाठी निष्पक्ष मध्यस्थ असल्याचा दावा करते,” असे पंतप्रधान कार्यालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पाकिस्तान अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामादरम्यान मध्यस्थी करत असताना हा वाद समोर आला आहे. इराण आणि अमेरिका या दोन देशांच्या शिष्टमंडळे इस्लामाबाद येथे वाटाघाटीसाठी एकत्र येणार आहेत. मात्र पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या या पोस्टमुळे या मध्यस्थीच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री काय म्हणाले होते?

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या आता डिलीट करण्यात आलेल्या पोस्टमध्ये पाकिस्तानच्या इस्रायलवर जोरदार टीका केली होती. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी इस्रायल ‘दुष्ट’ आणि ‘मानवतेसाठी शाप’ असल्याचे म्हटले होते. तसेच इस्लामाबादमध्ये शांततेसाठी चर्चा सुरू असताना लेबनॉनमध्ये नरसंहार केला जात असल्याचा आरोपही आसिफ यांनी केला होता.

“इस्रायलकडून पहिल्यांदा गाझा, नंतर इराण आणि आता लेबनॉननध्ये निष्पाप लोकांची हत्या केली जात आहे, रक्तपात अखंडपणे सुरूच आहे,” असे आसिफ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. “ज्या लोकांनी युरोपियन ज्यूंपासून सुटका मिळवण्यासाठी पॅलेस्टिनी भूमीवर हा कर्करोगासारखा देश निर्माण केला, ते नरकात जळावेत अशी मी आशा आणि प्रार्थना करतो,” असेही ख्वाजा आसिफ आपल्या पोस्टमध्ये म्हणाले होते.

इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडियन सार यांनी देखील पोस्ट करत आसिफ यांच्या विधानाचा निषेध केला. यावेळी त्यांनी इस्रायलच्या अस्तित्वाला धोका ठरणाऱ्यांविरोधात इस्रायल स्वत:चे रक्षण करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.