भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना लष्करी न्यायालयाकडून शिक्षा सुनाविताना पाकिस्तानी कायद्यातील सर्व नियम व कायद्यांचे पालन करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. तसेच फाशीच्या शिक्षेविरोधात कुलभूषण जाधव दाद मागू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना, कुलभूषण जाधव हे भारताचे सुपूत्र असून त्यांना फाशी दिल्यास पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील असे ठणकावून सांगितले होते. त्यानंतर काहीवेळातच पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांना बचावाची संधी देण्यात आल्याने भारताची दबावाची रणनीती काही अंशी यशस्वी ठरल्याचे दिसत आहे.

ख्वाजा आसिफ यांनी दिलेल्या माहितीनुसार कुलभूषण जाधव यांच्याकडे फाशीच्या निर्णयाविरोधात स्वत:ची बाजू मांडण्यासाठी ६० दिवसांचा अवधी आहे. मात्र, यापूर्वीही कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावताना पाकिस्ताने कायद्याचे पालन केल्याचे आसिफ  यांनी म्हटले. लष्करी न्यायालयात जाधव यांच्यावर तब्बल तीन महिने खटला सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुलभूषण जाधव यांना सोमवारी रावळपिंडी न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर भारताकडून लगेचच या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला होता. कुलभूषण जाधव यांना सुनाविण्यात आलेली फाशीची शिक्षा म्हणजे त्यांच्या हत्येचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप भारताने केला होता. पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याकरवी भारताने पाकला खरमरीत संदेशही पाठवला होता. त्यानंतर ख्वाजा आसिफ यांनी कुलभूषण जाधव यांना देण्यात आलेली शिक्षा पाकिस्तानविरुद्ध कट रचणाऱ्यांसाठी इशारा असल्याचे म्हटले होते.

कुलभूषण जाधवप्रकरणावर मंगळवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभा आणि लोकसभेत निवेदन दिले. सुषमा स्वराज म्हणाल्या, कुलभूषण जाधव यांनी कोणतेही गैरकृत्य केल्याचा पुरावा आढळलेला नाही. त्यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. त्यांना फाशीची शिक्षा देणे म्हणजे पूर्वनियोजित हत्याच ठरेल असे स्वराज यांनी सुनावले. कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याच्या दिशेने पाकिस्तानने पाऊल टाकले तर पाकिस्तानने परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहावे. दोन्ही देशांमधील संबंधावर याचे परिणाम होतील असे त्यांनी सांगितले. जाधव यांच्या रक्षणासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करणार. ते देशाचे सुपूत्र आहेत असे त्यांनी नमूद केले.