Khawaja Asif Israel Controversial Post: अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामानंतर पाकिस्तानमध्ये दोन्ही देशांत शांतता चर्चा होणार आहे. पाकिस्तान या चर्चेसाठी तयारी करत असताना संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या इस्रायलविरोधी पोस्टमुळे वादंग निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे आसिफ यांनी ही पोस्ट करुन नंतर हटवल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ख्वाजा आसिफ इस्रायलविरुद्ध केलेली पोस्ट त्यांनी दारुच्या नशेत केल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे.
ख्वाजा आसिफ यांची वादग्रस्त पोस्ट
अमेरिका-इराण शस्त्रसंधीच्या काळात लेबनॉनवर हल्ला केल्याबद्दल मंत्री ख्वाजा आसिफ यांनी गुरुवारी इस्रायलविरुद्ध नाराजी व्यक्त करणारी पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी इस्रायवर तीव्र शब्दात टीका केली. आसिफ यांनी इस्रायला ‘वाईट’ आणि ‘मानवतेसाठी शाप’ असल्याचे म्हटले होते. यावर पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले होते. “इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा सुरू असताना, लेबनॉनमध्ये नरसंहार केला जात आहे,” अशी पोस्ट आसिफ यांनी ‘एक्स’वर केली होती.
नशेत पोस्ट केल्याचा दावा
ख्वाजा आसिफ यांच्या पोस्टवरुन इस्रायलमधून कठोर शब्दात टीका होऊ लागल्यानंतर ही पोस्ट हटविण्यात आली. दरम्यान, आसिफ यांनी पोस्ट केली त्यावेळी ते नशेत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. लेबनीज-ऑस्ट्रेलियन उद्योजक, व्यावसायिक, पॉडकास्ट होस्ट आणि राजकीय भाष्यकार मारिओ नॉफल यांनी याबाबत एक्सवर पोस्टकरुन याबाबत शंका उपस्थित केली. “पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी इस्रायलला ‘वाईट आणि मानवतेसाठी शाप’ म्हणणारी आपली पोस्ट टाकल्यानंतर काही तासांतच हटवली. ती पोस्ट प्रकाशित करताना ते नशेत होते, असे कारण पुढे केले जात आहे,” शबाझ गिल यांचा स्रोत म्हणून हवाला देत मारिओ नॉफल यांनी पोस्ट केली आहे.
पोस्टनंतर इस्रायलकडून निषेध
“इस्रायलने सुरुवातीला गाझा नंतर इराण आणि लेबनॉनमध्ये नरसंहार केला. ज्या लोकांनी युरोपियन ज्यूंना हाकलून लावण्यासाठी पॅलेस्टिनी भूमीवर हे कर्करोगासारखे राज्य निर्माण केले, ते नरकात जळोत, मी अशी प्रार्थना करतो,” अशी पोस्ट आसिफ यांनी केली होती. आसिफ यांच्या पोस्टवर इराणमधून कठोर शब्दात टीका करण्यात आली. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी इस्रायलच्या संहाराची केलेली भाषा संतापजनक, असे मत इस्रायलने मांडले. तर, “असे विधान खपवून घेतले जाणार नाही. शांततेसाठी मध्यस्थ असल्याचा दावा करणाऱ्या सरकारकडून तर अजिबात नाही”, असे इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
असीम मुनीर यांनी आसिफ यांना खडसावले
आसिफ यांच्या या प्रकरणाची पाकिस्तानमध्येही गंभीर दखल घेण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार, पाकचे लष्करप्रमुध असीम मुनीर यांनीही ख्वाजा आसिफ यांना खडेबोल सुनावत जबाबदाराने वागण्याचा सल्ला दिला. आसिफ यांच्या कृतीमुळे मुनीर यांचा पारा चांगलाच चढला होता असे सांगितले जाते. आसिफ यांच्याशी चर्चा करुन मुनीर यांनी खडसावले असल्याचे वृत्त सुत्रांच्या हवाल्याने समोर आले आहे. दरम्यान, अत्यंत संवदेनशील इराण – अमेरिका युद्धविरामानंतर पाकिस्तानमध्ये शांतता चर्चा होत असतान आसिफ यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानवर टीका होऊ लागली आहे.
