Khawaja Asif India Threat: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला इशारा देताना थेट कोलकाता शहराचा उल्लेख केला आहे. “भविष्यातील कोणताही संघर्ष केवळ सीमेपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो थेट भारताच्या आतपर्यंत पोहोचेल,” असे चिथावणीखोर विधान त्यांनी शनिवारी केले. मात्र, दरवेळेप्रमाणेच याही वेळी त्यांनी आपल्या दाव्यांना पुष्टी देण्यासाठी कोणताही पुरावा सादर केलेला नाही.
काय म्हणाले ख्वाजा आसिफ?
सियालकोटमध्ये पत्रकारांशी बोलताना आसिफ यांनी भारतावर ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’ (बनावट कारवाई) करण्याचा कट रचल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “जर भारताने यावेळी कोणतीही बनावट कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तर देवाची इच्छा असल्यास, आम्ही ते कोलकातापर्यंत नेऊ. आम्हाला असे संकेत मिळत आहेत की, स्वतःच्याच माणसांचा किंवा ताब्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा वापर करून मृतदेह तिथे ठेवले जाऊ शकतात आणि त्याचा दोष दहशतवादावर टाकला जाऊ शकतो.”
केवळ कोलकाताच नव्हे, तर संघर्षाची पुढची फेरी अधिक भीषण असेल, अशी धमकीही त्यांनी दिली. “आम्ही त्यांच्या हद्दीत प्रवेश करून त्यांच्याच घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करू,” असे आक्रमक विधानही त्यांनी यावेळी केले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा ‘अभूतपूर्व’ इशारा
पाकिस्तानच्या या विधानांपूर्वी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कडक शब्दात इशारा दिला होता. केरळमधील एका कार्यक्रमात बोलताना सिंह म्हणाले की, “पाकिस्तानने कोणत्याही प्रकारचे ‘दुष्ट कृत्य’ केल्यास भारताकडून अभूतपूर्व आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल. एप्रिल २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की, “आमची मोहीम अजून संपलेली नाही. पाकिस्तानने पुन्हा तसा प्रयत्न केल्यास आमचे सशस्त्र दल त्यांना कधीही न विसरणारे सडेतोड उत्तर देतील.”
पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा पार्श्वभूमी
दोन्ही देशांमधील संबंध एप्रिल २०२५ पासून कमालीचे ताणले गेले आहेत. २२ एप्रिल २०२५ पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जण ठार झाले होते. यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर १० मे २०२५ रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला होता.
माजी राजदूताची वादग्रस्त विधाने
केवळ विद्यमान मंत्रीच नव्हे, तर माजी मुत्सद्दीही आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनीही नुकतेच मुंबई आणि दिल्लीला लक्ष्य करण्याबद्दल वक्तव्य केले होते. “जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला, तर आम्ही क्षणाचाही विचार न करता मुंबई आणि नवी दिल्लीवर हल्ला करू,” असे अजब तर्कशास्त्र त्यांनी मांडले.
