Pakistan demands Nobel for Shehbaz Sharif and Asim Munir: इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर इराणबरोबर दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला. इराणने देखील यासाठी तयारी दर्शवली. पाकिस्तानने केलेल्या यशस्वी शिष्टाईमुळे उभय देशांमध्ये युद्धविराम घोषित करण्यात आला. इस्रायलने देखील यासाठी सकारत्मक असल्याचे जाहीर केले. पण, तात्पुरत्या युद्धविरामाचे श्रेय घेण्यास पाकिस्तानने सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांना यासाठी नोबेल शांतता पुरस्कार देण्यात यावा, अशीही मागणी पाकिस्तानमधून पुढे येऊ लागली आहे.

शरीफ – मुनीर यांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी

पाकिस्तान माध्यमं आणि कराची चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने याबाबत मागणी करण्यात येत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामासाठी यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांना नोबेल देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली न केल्यास संपूर्ण इराणी संस्कृती बेचिराख करण्याची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. यासाठी देण्यात आलेली मुदत संपण्यापूर्वी दोन अगोदर ट्रम्प यांनी शस्त्रसंधीचा करार केला.

अमेरिका – इराण यांच्यात शस्त्रसंधी

“होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे आणि सुरक्षितपणे खुली करण्याच्या अटीवर अमेरिकेने इराणवर दोन आठवड्यांसाठी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला. इराणकडून आम्हाला १० कलमी प्रस्ताव मिळाला आहे. याबाबत चर्चेतून वाटाघाटी केली जाईल. यातील अनेक मुद्यांवर अमेरिका आणि इराणमध्ये सहमती झाली आहे. पण दोन आठवड्यांत यावर चर्चा करुन अंतिम करारावर निर्णय घेतला जाईल”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांनी केलेल्या या पोस्टमध्ये शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांच्याशी चर्चा झाल्याचा उल्लेख केला. इराणकडून देखील या चर्चेच्या दाव्याला दुजोरा देण्यात आला.

पाकिस्तानी माध्यमांची मागणी

पाकिस्तानी माध्यमांनी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीचे यश घेण्याची धडपड सुरु केली आहे. पाकिस्तानच्या शिष्टाईला यश आल्याने हे कार्य नोबेल शांतता पुरस्काराच्या दर्जाचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ट्रम्प यांच्या धमकीमुळे विनाशाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या युद्धात पाकिस्तानमुळे चर्चेचे वातावरण निर्माण झाले व तोडगा निघाला असा दावा आता पाकिस्तानी माध्यमांनी करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र द नेशनमध्ये निवृत्त लष्करी अधिकारी अहमद नदीम कादरी यांनी लिहलेल्या एका लेखात नोबेल पुरस्काराच्या मागणीचा उल्लेख करण्यात आला आहे. हाच सूर अनेक माध्यमांनी लावून धरल्याचे दिसून येत आहे.

कराची चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची मागणी

कराची चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने देखील शाहबाज आणि मुनीर यांच्यासाठी नोबेल पुरस्काराचा मागणी केली आहे. कराची चेंबर्सने टॅरिफ कमी करण्यासाठी अमेरिकेबरोबर संवाद साधण्याचीही मागणी केली आहे. शिवाय इराण आणि पाकिस्तानला जोडणारी गॅस पाईपलाईनचे काम देखील जलदगतीन पूर्ण करण्याची मागणी केलीय. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील पहिली बैठक शुक्रवारी पाकिस्तानमध्ये होणार आहे.