बांगलादेशला अणुऊर्जा प्रकल्पासाठी इंधन घेऊन जाणाऱ्या विमानासाठी पाकिस्तानने हवाई क्षेत्र खुले करण्यास नकार दिला आहे. बांगलादेशमधील रूपपूर येथे पहिला वहिला अणुऊर्जा प्रकल्प सुरु होत आहे. या प्रकल्पाच्या युनिट-२ साठी २४ सप्टेंबर रोजी रशियातून इंधन घेऊन जाणारे विमान दाखल होणार होते. मात्र, पाकिस्तानकडून या विमानासाठी हवाई क्षेत्र खुले करण्यास नकार दिला.

बांगलादेश ऊर्जेचा तुटवडा

बांगलादेशमध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प सुरु होणार आहे, यासाठी इंधन मिळवून प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यावर त्यांचा भर आहे. बांगलादेश सध्या ऊर्जा तुटवड्याचा सामना करत आहे. अशा पाकिस्तानने इंधन घेऊन येणाऱ्या विमानाला हवाई क्षेत्र वापरण्यास नकार दिल्याने याचा थेट फटका बांगलादेशच्या अणुऊर्जा प्रकल्पाला बसणार आहे. यामुळे प्रकल्प कार्यान्वित होण्यास देखील विलंब होणार आहे.

रशियन कंपनीवर युरेनियम पुरवण्याची जबाबदारी

रुपपूर येथील अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम रशियातील रोसटोमने हाती घेतले असून, त्यांच्यावरच बांगलादेशला युरेनियम पुरवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पाकिस्तानने हवाई क्षेत्र वापरण्यास परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट करतच इस्लामाबादकडून त्याचे कारण देण्यात आले नसल्याची माहिती बांगलादेशचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फकीर महबूब अनम यांनी माध्यमांना दिली. रशियातून येणारे अजरबैझान, कझाकस्तान, पाकिस्तान आणि भारत असा प्रवास करुन राजधानी ढाकामध्ये उतरणार होते. दरम्यान, पाकिस्तानने विमानास हवाई क्षेत्र वापरण्यास परवानी नाकारली.

ऐनवेळी बंद केले हवाई क्षेत्र

हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानकडून ऐनवेळी घेण्यात आला, असे बांगलादेशी माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. विशेष म्हणजे बांगलादेशी अणुऊर्जा आयोगाने मात्र कोणत्या देशाने हवाई क्षेत्र बंद केले याबाबत मौन बाळगले आहे. ढाका विमानतळावर विमानाच्या स्वागतासाठी सर्व तयारी करण्यात आली होती मात्र, हवाई क्षेत्र बंद केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. दरम्यान, यामुळे बांगलादेशचा अणुऊर्जा प्रकल्प लांबणीवर पडला असून, यात पर्यायी मार्गाने इंधन पुरवण्याची सोय केली आहे. प्रकल्प ऑक्टोबरमध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने या प्रकरणी स्पष्टीकरण देताना या घटनेमागे तांत्रिक आणि कार्यपद्धतीशी निगडीत कारणे दिली आहेत.