Pakistan Deploys Troops Saudi Arabia: पाकिस्तानने सौदी अरेबियामध्ये ८,००० सैनिक, लढाऊ विमानांची एक तुकडी आणि एक हवाई संरक्षण प्रणाली तैनात केली आहे, अशी माहिती पाकिस्तानमधील वरिष्ठ लष्करी सूत्रांनी सोमवारी रॉयटर्सला दिली. परस्पर संरक्षण कराराअंतर्गत पाकिस्तानकडून सैनिक तैनात केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात मुख्य मध्यस्थी म्हणून भूमिका पार पाडत असताना पाकिस्तान सौदीला लष्करी मदत करत आहे. भविष्यात हल्ला झाल्यास आवश्यक मदतीसाठी ही तैनाती केल्याची माहिती समोर आलीय.

पाकिस्तान – सौदी यांच्यात करार

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सैनिक सौदीमध्ये तैनात केल्याची पुष्टी सुरक्षा दलातील तीन अधिकारी आणि दोन सरकारी सूत्रांकडून करण्यात आली आहे. सौदी अरेबियावर भविष्यात हल्ला झाल्यास आवश्यक मदत मिळावी या उद्देशाने पाकिस्तानकडून सैनिक तैनात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यावर पाकिस्तान आणि सौदी अरेबिया सरकारने अधिकृत भाष्य करण्याचे टाळले आहे. पाकिस्तान आणि सौदी यांच्या गेल्यावर्षी झालेल्या परस्पर संरक्षण करार पूर्णपणे गोपनीय असल्याचे सांगितले जाते.

मदतीची हमी देणारा करार

लष्करी सहाकार्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या करारानुसार, दोन्हीपैकी कोणत्याही एका देशावर हल्ला झाल्यास दुसऱ्या देशाने मदतीला येणे अपेक्षित आहे. पाकिस्तानने सौदीला नेहमीच सहकार्य करण्याचे भाष्य केले आहे. सौदी पाकिस्तानी आण्विक सुरक्षेच्या छत्रीखाली सुरक्षित असल्याचे वक्तव्य पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी यापूर्वी केले होते.

लष्करी मदत

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने जेएफ-१७ विमानांचा समावेश असलेल्या १६ लढाऊ विमानांची एक तुकडी सौदीला पाठवली आहे. ड्रोनची देखील एक पाठविण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी सूत्रांनी रॉयटर्सला दिली आहे. याशिवाय आठ हजार सैनिक तैनात केल्याची पुष्टी सर्व सूत्रांनी केल्याची रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले आहे. तसेच, गरज भासल्यास अधिक पुरविण्याचा वायदा देखील पाकिस्तानने केल्याचे सांगितले जात आहे.

८०,००० सैनिक तैनातीचा विचार

पाकिस्तान सौदीमध्ये ८० हजार सैनिक तैनात करण्याची शक्यता एका सरकारी सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली. सौदीच्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी सैनिक तैनात केले जाणार असल्याचे सूत्रांनी रॉयटर्सला स्पष्ट केले. करारानुसार पाकिस्तान युद्धनौका देखील तैनातीचा विचार करु शकते, असेही या वृत्तात पुढे म्हटले आहे. पाकिस्तानकडून तैनात करण्यात आलेले सैनिक, लढाऊ विमानं, हवाई सुरक्षा प्रणाली विविध शक्यतांचे संकेत असल्याचे मत सूत्रांकडून व्यक्त केले जात आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून सौदीला लष्करी प्रशिक्षण आणि सल्ला देत असते. पण, पाकिस्तानच्या या निर्णयामुळे इराण-अमेरिका संघर्षाच्या शांतता चर्चेत मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.