पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्या नातवाला सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली असून, यावरून पाकिस्तानात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या हाय-प्रोफाइल प्रकरणामुळे उपपंतप्रधान इशाक दार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लाहोरमध्ये २९ जून रोजी दोन परदेशी महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्य संशयितांमध्ये उपपंतप्रधान इशाक दार यांचा नातू मोहम्मद रझा दार याचा समावेश आहे. पीडित महिलांमधील एक जण व्हेनेझुएलाची तर दुसरी नेदरलँड्सची नागरिक आहे.

कोर्टानं दिली ५ दिवसांची पोलिस कोठडी

वृत्तसंस्था ‘पीटीआय’ने दिलेल्या माहितीनुसार, लाहोर पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक केली असून, एक आरोपी अजूनही फरार आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना, ज्यात इशाक दार यांच्या नातवाचाही समावेश आहे, लाहोर न्यायालयाने शुक्रवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सिंगापूरमध्ये ओळख, पाकिस्तानात अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रझा दार याची गेल्या वर्षी सिंगापूरमध्ये या दोन्ही परदेशी महिलांशी ओळख झाली होती. ते सर्वजण ‘क्रिप्टोकरन्सी’ व्यवसायात भागीदार होते. याच व्यवसायाच्या निमित्ताने रझाने या दोन्ही महिलांना पाकिस्तानात येण्यासाठी बिझनेस व्हिसा मिळवून दिला होता. मात्र, पाकिस्तानात आल्यानंतर त्यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला.

“पाकिस्तान कॉर्पोरेट कंपनीसारखं चालवलं जातंय” – खासदाराचा घणाघात

पाकिस्तानच्या लष्कराशी जवळचे संबंध असलेले अपक्ष खासदार फैसल वावडा यांनी या प्रकरणावरून उपपंतप्रधान इशाक दार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. फैसल वावडा यांनी थेट इशाक दार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “परदेशी दूतावासाने हस्तक्षेप केल्यानंतरच मुख्य आरोपी असलेल्या उपपंतप्रधानांच्या नातवाला अटक करण्यात आली, हे अत्यंत लाजीरवाणं आहे. इतके गंभीर आरोप झाल्यानंतर इशाक दार कोणत्या तोंडाने जगासमोर पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री म्हणून प्रतिनिधित्व करणार?”

पुढे बोलताना वावडा यांनी संताप व्यक्त केला की, “पाकिस्तान सध्या एखाद्या कौटुंबिक कॉर्पोरेट कंपनीसारखा चालवला जात आहे. जर सरकारला देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची थोडी जरी काळजी असेल, तर इशाक दार यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.”

प्रकरण दाबण्याचा आणि पीडितांना मायदेशी पाठवण्याचा प्रयत्न?

खासदार वावडा यांनी केंद्र सरकार आणि पंजाब प्रांतातील सरकारवर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. “या सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्याला केवळ ‘पैशांची खंडणी’ गोळा केल्याचा रंग देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, दोन्ही पीडित परदेशी महिलांना लवकरात लवकर त्यांच्या देशात परत पाठवण्याची घाई केली जात आहे,” असा खळबळजनक दावाही त्यांनी केला.

इशाक दार यांच्या अडचणीत वाढ

इशाक दार हे पाकिस्तानच्या राजकारणातील अत्यंत वजनदार नेते मानले जातात. नुकतेच ते इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कारासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासोबत तेहरानला गेले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची मध्यस्थ म्हणून भूमिका मांडणाऱ्या दार यांच्यावर आता स्वतःच्याच घरात घडलेल्या या गंभीर गुन्ह्यामुळे जगभरातून नामुष्की ओढवली आहे.