Pakistan ISI ex Chief Hameed Visit to Kabul: पाकिस्तानची सध्याची आर्थिक स्थिती चिंताजनक झाली असून जागतिक संस्थांकडून पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणावर कर्जही घेतलं आहे. त्याशिवाय, आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून पाकिस्तानसाठी आर्थिक मदतदेखील केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची अर्थव्यवस्था लवकरात लवकर स्थिर होण्याची आवश्यकता असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये व पाकिस्तानच्या भूमीतून होत असणाऱ्या दहशतवादी कारवायांनी गंभीर रूप धारण केलं आहे. या सर्व परिस्थितीत पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी लंडनमध्ये केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशक दार सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान यांनी ब्रिटिश सरकारमधील अनेक उच्चपदस्थांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच, तेथील पाकिस्तानी नागरिकांच्या संघटनांशीही संवाद साधला. यानंतर लंडनच्या बेलग्राविया भागातील पाकिस्तान हाय कमिशनच्या कार्यालयात त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. तेव्हा लंडन दौऱ्यासोबतच पाकिस्तानमधील सद्यस्थिती आणि त्यावरची कार्यवाही याबाबतही त्यांनी भाष्य केलं. पाकिस्तानी वृत्तसंस्था डॉननं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

आधीच्या सरकारवर आगपाखड!

इशक दार यांनी यावेळी आधीच्या इम्रान खान सरकारवर आगपाखड केली. इम्रान खान सरकारनं त्यांच्या काळात अनेक चुका केल्या. तसेच, त्यांच्या कारकि‍र्दीत लष्करी अधिकाऱ्यांनीही काही चुका केल्या. मात्र, विद्यमान सरकारच्या कार्यकाळात पाकिस्तान व ब्रिटन यांच्यातील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होतील, असे सूतोवाच त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल फैझ हमीद यांच्या काबूल भेटीवरून संतप्त प्रतिक्रिया दिली.

“पाकिस्तान सध्या अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये तेव्हा घेतलेल्या त्या एक कप चहाची किंमत चुकवत आहे. त्यावेळी ज्या दहशतवाद्यांना सोडण्यात आलं होतं, तेच आता बलुचिस्तानमधील दहशतवादी कृत्यांमागचे सूत्रधार आहेत”, असं इशक दार म्हणाले.

‘एक कप चहा’चा संदर्भ काय?

डॉननं दिलेल्या वृत्तानुसार, २०२१ च्या सप्टेंबर महिन्यात आयएसआय प्रमुख हमीद काबूल दौऱ्यावर गेले होते. तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर काही आठवड्यांतच हा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हमीद यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये हमीद काबूलमध्ये काही तालिबानी पदाधिकाऱ्यांसमवेत चहा घेताना दिसत आहेत. त्यांच्या हातात चहाचा कप आहे. माध्यम प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया विचारताच “सर्वकाही ठीक होईल”, असंही त्यांनी सांगितलं होतं.

त्यावेळी हमीद यांनी काही दहशतवाद्यांना सोडण्याचा निर्णय घेतल्याचा संदर्भ इशक दार यांनी त्यांच्या लंडनमधील प्रतिक्रियेमध्ये दिल्याचं ‘डॉन’च्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

Kargil War : २५ वर्षांनंतर पाकिस्तान सैन्याने मान्य केली कारगिल युद्धातील भूमिका; लष्करप्रमुख असीम मुनीर म्हणाले, “आमच्या सैनिकांनी…”

“इम्रान खान यांच्या परवानगीशिवाय शक्यच नाही”

दरम्यान, हमीद तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या परवानगीने काबूलमध्ये गेले होते का? अशी विचारणा केली असता दार यांनी त्यावर होकारार्थी उत्तर दिलं. “मला हे मान्य करणंच कठीण आहे की हमीद तेव्हाच्या पंतप्रधानांच्या परवानगीशिवाय काबूलला गेले असतील. आम्ही आजही सुरक्षा व्यवस्थेबाबतच्या समस्यां सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. पंतप्रधानांच्या परवानगीशिवाय आयएसआय प्रमुख काबूलला जाणं शक्यच नाही”, असं दार म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan deputy prime minister ishaq dar on isi chief kabul visit cup of tea pmw
Show comments