भारतीय सैन्यदलाच्या पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझर याला पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. मसूद अझरसोबतच त्याच्या संघटनेतील काही महत्त्वाच्या सदस्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मसूद अझर याला पठाणकोट हल्ल्यासंदर्भात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेच्या सदस्यांमध्ये मसूदचा भाऊ रौफ याचाही समावेश आहे.
पठाणकोट हल्लाप्रकरणी ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांना अटक
तत्पूर्वी, या हल्लाप्रकरणी ‘जैश-ए-मोहम्मद’च्या संशयित दहशतवाद्यांना पाकिस्तानात अटक करण्यात आली. शिवाय मसूद अझरच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकत पाक सरकारने या ठिकाणांना सील केले आहेत. पठाणकोट हल्लाप्रकरणी पाक सरकारने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
पठाणकोट हल्ला : कुठे चुकलो? काय शिकलो?
दरम्यान, पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याची सूत्रे मसूद अझर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ अझर यांच्यासह आणखी दोघांकडून  हलविण्यात आल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या तपासात निष्पन्न झाले होते. १९९९मधील ‘इंडियन एअरलाइन्स’च्या आयसी-८१४ विमानाच्या अपहरणाचा सूत्रधार देखील रौफ हाच होता. या चौघांचा तपशील पाकिस्तानला देऊन त्यांच्याविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी भारताने केली होती.