Daulat Ali Pakistan Detained: काश्मीरमधील मानवाधिकार आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे ब्रिटनच्या लेबर पक्षाचे नगरसेवक दौलत अली यांना पाकिस्तानात स्थानबद्ध करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली असली, तरी त्यांना ब्रिटनमध्ये परत जाण्यापासून रोखण्यात आले आहे. लाहोर विमानतळावर त्यांना विमानात चढण्यास बंदी घालण्यात आली. काश्मीरबाबत घेतलेल्या रोखठोक भूमिकेमुळेच ही कारवाई झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इंडिया टुडेने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.

दौलत अली हे ब्रिटनमधील ‘रॉचडेल बरो कौन्सिल’चे उपनेते आहेत. रॉचडेल आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील साहिवाल शहर यांच्यात १९९८ पासून ‘ट्विन सिटी’ करार आहे. या संबंधांच्या पार्श्वभूमीवर रॉचडेलचे महापौर फैसल राणा यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळासह अली ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते.

स्थानिक वृत्तानुसार, ऑक्टोबरच्या मध्यात दौलत अली इस्लामाबाद विमानतळावर उतरताच पाकिस्तानी यंत्रणांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची अनेक तास कसून चौकशी केली. ब्रिटिश आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली व ते पुन्हा शिष्टमंडळात सामील झाले. रॉचडेल कौन्सिलने या वृत्ताला दुजोरा दिला असून, “काश्मीर प्रश्नावरील त्यांच्या दीर्घकालीन सक्रियतेमुळेच ही कारवाई झाली असावी,” अशी शक्यता वर्तवली आहे.

लाहोर विमानतळावर रोखले

शिष्टमंडळाचा दौरा आटोपल्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी दौलत अली लाहोर विमानतळावरून ब्रिटनला जाणाऱ्या विमानाने परतणार होते. मात्र ऐनवेळी त्यांना विमानातून उतरवण्यात आले. पाकिस्तानच्या ‘फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’च्या नियंत्रण यादीत त्यांचे नाव असल्याने त्यांना देश सोडण्यास मज्जाव करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दौलत अली यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ते कोठडीत नसले तरी त्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इस्लामाबादला जाण्यास सांगण्यात आले आहे.

पाकव्याप्त काश्मीरबाबत रोखठोक भूमिका

मूळचे पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली येथील रहिवासी असलेले दौलत अली हे पहारी भाषेतील लेखक असून, ब्रिटनमध्ये त्यांनी काश्मिरी समाजाच्या विविध संस्थांच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. आपल्या लेखांमधून त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानची भूमिका ही ‘व्यापारी किंवा कब्जा करणाऱ्या सत्तेसारखी’ असल्याचे म्हटले होते.

सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये मूलभूत हक्क आणि सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने सुरू असून, प्रशासनाने इंटरनेट बंदी व आंदोलकांवर तीव्र कारवाईचे सत्र सुरू ठेवले आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात अली यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

ब्रिटनमधून तीव्र प्रतिक्रिया

दौलत अली यांच्यावर झालेल्या या कारवाईचे तीव्र पडसाद ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात उमटले आहेत. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार लेबर पक्षाचे खासदार इम्रान हुसेन यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करत म्हटले आहे की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर राखला गेलाच पाहिजे. दौलत अली यांची सुरक्षित आणि त्वरित मायदेशी परत पाठवणी व्हावी, यासाठी मी संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली आहे.”