‘पाकिस्तानने सहिष्णुता शिकवू नये’

पाकिस्तानने आम्हाला सहिष्णुता शिकवू नये, असे भारताने सुनावले आहे.

India Pakistan Relationship,भारत,पाकिस्तान
उभय देशांच्या संबंधातला निर्णायक भाग असल्याचे वक्तव्य पाकिस्तानने केल्याबद्दल भारताने तीव्र टीका केली आहे.

गुलाम अली- कसुरी बहिष्काराच्यानिमित्ताने भारताचे प्रत्युत्तर

आपल्या नेत्यांचे कार्यक्रम भारतात उधळण्याचे प्रयत्न होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करतानाच अतिरेकी मार्ग टाळणे हा उभय देशांच्या संबंधातला निर्णायक भाग असल्याचे वक्तव्य पाकिस्तानने केल्याबद्दल भारताने तीव्र टीका केली आहे. पाकिस्तानने आम्हाला सहिष्णुता शिकवू नये, असे भारताने सुनावले आहे.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांचा मुंबईतील कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न शिवसेनेने सोमवारी केला. त्याआधी गायक गुलाम अली यांच्या मुंबई व पुण्यातील मैफलीही शिवसेनेच्या विरोधामुळे रद्द कराव्या लागल्या. या प्रकारांबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी चिंता व्यक्त केली आणि या प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे मत व्यक्त केले. त्यावर टीका करताना भारताने म्हटले आहे की, पाकिस्तान जणू सहिष्णुतेचा राखणदार असल्याच्या थाटात बोलत आहे. या गोष्टींबाबत त्यांनी आम्हाला ज्ञान पाजू नये. आमच्यात काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याची क्षमताही आमच्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात झालेल्या चर्चेनुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चेची आमची इच्छा आहे. मात्र पाकिस्तानातील लोकशाहीबाह्य़ शक्ती आणि तेथील परिस्थिती यामुळे पाकिस्तानला ते साधत नाही. जोवर दहशतवादाला कोणत्याही प्रकारचा राजकीय पाठिंबा लाभणार नाही, याची हमी मिळत नाही तोवर फलदायक चर्चा होऊ शकत नाही, असे भारताने स्पष्ट केले.

जिना हाऊस पाकिस्तानला हवे!

मुंबईतील जिना हाऊस या मलबार हिल येथील महम्मद अली जिना यांच्या निवासस्थानात पाकिस्ताचा वाणिज्यदूतावास सुरू करावा, ही मागणी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांनी मंगळवारी रेटली. पाकिस्तानची ही जुनीच मागणी आहे. भारतानेही कराचीतील आपला दूतावास पुन्हा सुरू करावा, असे मतही त्यांनी मांडले. परराष्ट्रमंत्रीपदाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच २००२ ते २००७ या कालावधीत जिना हाऊसमध्ये पाकिस्तानी दूतावास सुरू व्हावा, यासाठी मी प्रयत्न सुरू केले होते, असे ते म्हणाले

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pakistan dont teach tolerance