scorecardresearch

Video: “पाकिस्तानच्या विकासाची जबाबदारी अल्लाहचीच”, अर्थमंत्री इशक दार यांचं अजब तर्कट! म्हणाले, “जर अल्लाह…!”

इशक दार म्हणतात, “पाकिस्तान जगात अनादीकाळापर्यंत अस्तित्वात राहण्यासाठी अल्लाहनं निर्माण केला आहे. जगभरात हा एकमेव देश आहे की…!”

pakistan finance minister ishaq dar allah responsible
पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांचं अजब तर्कट! (फोटो – रॉयटर्स)

आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या चर्चेच असलेल्या मुद्द्यांमध्ये पाकिस्तानची वेगाने खालावत जाणारी आर्थिक परिस्थिती हा महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. पाकिस्तानवर आर्थिक संकट ओढवलं असून त्यावरून सध्या स्थानित पातळीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विद्यमान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या आर्थिक अरिष्टासाठी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे प्रकार तिथे घडू लागले असतानाच पाकिस्तानचे केंद्रीय अर्थमंत्री इशक दार यांचं एक विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. आपलं सरकार पाकिस्तानच्या विकासासाठी सर्व ते प्रयत्न करत असल्याचं सांगतानाच इशक दार यांनी ‘या सगळ्याची जबाबदारी अल्लाहची’ असल्याचं म्हटलं आहे.

पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत चालली आहे. देशावर असणारा कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. शिवाय, पाकिस्तानमध्ये असलेली परकीय गंगाजळी आटण्याच्या मार्गावर आहे. रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला असून पाकिस्तानी रूपयाचा दर डॉलरच्या तुलनेत अभूतपूर्व असा घसरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट निर्माण झालं असून त्यातून दहशतवादाला चालना मिळू शकते, अशी भीती आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानही श्रीलंकेसारखा दिवाळखोरीच्या वाटेवर; अन्नधान्य, वीजेच्या टंचाईनंतर आता रुपयाची निच्चांकी घसरण

आर्थिक विकासाची जबाबदारी नेमकी कुणाची?

दरम्यान, पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक संकटाविषयी एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री इशक दार यांनी अजब तर्कट मांडलं आहे. “पाकिस्तान जगात अनादीकाळापर्यंत अस्तित्वात राहण्यासाठी अल्लाहनं निर्माण केला आहे. जगभरात हा एकमेव देश आहे की ज्याची निर्मिती इस्लामच्या नावे झाली आहे. सौदी अरेबियाचीही निर्मिती इस्लामच्या नावे झालेली नाही. त्यामुळे जर अल्लाहनं याची निर्मिती केली आहे तर पाकिस्तानचं संरक्षण, विकास आणि समृद्धीही अल्लाहचीच जबाबदारी आहे”, असं इशक दार म्हणाले आहेत.

आधीच्या सरकारवर फोडलं खापर!

दरम्यान, पाकिस्तानमधील आर्थिक स्थितीसाठी इशक दार यांनी आधीच्या सरकारवर खापर फोडलं आहे. “आधीच्या सरकारनं केलेल्या चुकांचा फटका पाकिस्तानला सहन करावा लागतो आहे. २०१३ ते २०१७ या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कार्यकाळात पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत होती. पाकिस्तानचा शेअर बाजार दक्षिण आशियात सर्वोत्कृष्ट होता. नवाज शरीफ यांच्या कळात तो जगात पाचव्या क्रमांकावर होता. पण नंतरच्या काळात हा विकासाचा गाडा भरकटला”, असंही इशक दार म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 13:28 IST
ताज्या बातम्या