Pakistan Economic Crisis Amid US-Iran War: अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यात गेल्या दोन महिन्यांपासून चालू असलेल्या युद्धाचा फटका अवघ्या जगाला सहन करावा लागत आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाचा व्यापार मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला असून त्याचा परिणाम अनेक देशांमध्ये, प्रामुख्याने युरोपीय व आशियाई देशांमध्ये इंधनाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण होण्यात झाला आहे. या पार्श्वभूमीवर युद्धसमाप्ती लवकरात लवकर व्हावी, यासाठी सर्वच राष्ट्रे वाट पाहात असताना युद्धामुळे निर्माण झालेल्या देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचाही सामना करताना दिसत आहेत. पाकिस्तानमध्ये युद्धाचे मोठे आर्थिक परिणाम दिसत असून खुद्द पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीच याबाबत कबुली दिली आहे.
पाकिस्तानकडून इराण युद्धात मध्यस्थी करण्यात आल्यानंतर अमेरिका व इराणचे प्रतिनिधी यांच्यात पाकिस्तानात युद्धसमाप्तीसाठी चर्चा होत आहेत. या मध्यस्थीचं श्रेयदेखील पाकिस्तान घेत असताना दुसरीकडे या मध्यस्थीमागचं कारणदेखील पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या कबुलीतून समोर येत आहे. या युद्धामुळे पाकिस्तानला बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे पाकिस्तानचा आर्थिक विकास तब्बल २ वर्षं मागे गेल्याचं शाहबाज शरीफ यांनी मान्य केलं आहे.
मध्यस्थी करण्यावर पाकिस्तान ठाम
देशातील आर्थिक स्थिती बिकट असताना पाकिस्तानकडून युद्धात मध्यस्थीसाठी पुढाकार घेण्यात आला असून आपण त्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचं शरीफ यांनी नमूद केलं आहे. यासंदर्भात शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी संसदेला माहिती दिली आहे. युद्धसमाप्तीसाठी मध्यस्थीला ११ एप्रिलपासून सुरुवात झाली असून त्या दिवशी तब्बल २१ तास सलग चर्चा घडवून आणण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून दोन्ही बाजूंनी युद्धविरामाला सहमती दिली असून हा युद्धविराम अजूनही कायम असल्याचं शरीफ यांनी संसदेसमोर सांगितलं.
पाकिस्तानचा तेल आयातीवरील खर्च तिप्पट!
दरम्यान, कच्च्या तेलाच्या तुटवड्यामुळे पाकिस्तानला खरेदी कराव्या लागणाऱ्या तेलाच्या दरांमध्ये जवळपास तिप्पट वाढ झाल्याचं दिसून येत आहे. शरीफ यांनी संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार, युद्ध सुरू होण्याआधी पाकिस्तानला तेल खरेदीवर ३० कोटी डॉलर्स इतका खर्च करावा लागत होता. आता हा खर्च थेट ८० कोटी डॉलर्सच्या घरात गेला आहे. त्यामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याची कबुलीच त्यांनी पाकिस्तानी संसदेत दिली.
अरागची यांचं पाकिस्तानला ‘हे’ आश्वासन
दरम्यान, इरणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांनी पाकिस्तानला युद्धसमाप्तीच्या दृष्टीने इराण सकारात्मक विचार करेल, असं आश्वासन दिल्याचं शरीफ म्हणाले. “इराणचे परराष्ट्रमंत्री अरागची रशिया भेटीवर जाण्याआधी मी त्यांच्याशी फोनवर बोललो. युद्धसमाप्तीसंदर्भात ओमानमध्ये झालेल्या सर्व बैठकांमध्ये इराणची भूमिका ही सकारात्मक अशीच होती. या बैठकांमधील भूमिकांसाठी इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाशी सातत्याने चर्चा केली असून लवकरच यावर इराण सकारात्मक उत्तर देईल असं आश्वासन अरागची यांनी दिलं आहे”, अशी माहिती शरीफ यांनी दिली.
लवकरच युद्धसमाप्तीसाठीच्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेला पाकिस्तानमध्ये सुरुवात होणार आहे. सध्या अमेरिकेने अनिश्चित काळासाठी युद्धविराम जाहीर केला असून चर्चेसाठी सकारात्मक धोरण ठेवलं आहे. मात्र, दोन्ही बाजू आपापल्या मागण्यांसाठी ठाम असल्यामुळे या चर्चांमधून नेमकं काय साध्य होणार? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे.
