Imran Khan Private Life: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान रावळपिंडी येथील आदियाला तुरुंगात कैद आहेत. मात्र वर्षभरापासून त्यांच्या बहिणींची भेट न होऊ दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी अफवा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सोशल मीडियात जोर धरू लागली. यानंतर इम्रान खान चर्चेत आले आहेत. यानिमित्ताने इम्रान खान यांच्या घटस्फोटित पत्नी रेहम खान यांच्या पुस्तकाची पुन्हा चर्चा होत आहे. या पुस्तकात इम्रान खान यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खळबळजनक दावे रेहम खान यांनी केले होते.
इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवेनंतर सोशल मीडियावर ते ट्रेंड करत आहेत. यातच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खळबळजनक माहिती असलेले ‘रेहम खान’ हे पुस्तकही चर्चेत आहे. या पुस्तकातील वादग्रस्त मजकुराचा स्क्रिनशॉट, त्यातील उतारे सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. क्रिकेटपटू, पाकिस्तानचे राजकारणी म्हणून जगाला परिचित असलेल्या इम्रान खान यांच्या खासगी आयुष्यातील बाबींची चवीने चर्चा केली जाते.
अंमली पदार्थाचे सेवन, अनौरस मुले आणि पुरूषांची आवड
रेहम खान या ब्रिटीश पत्रकार असून इम्रान खान यांच्या त्या द्वीतीय पत्नी होत्या. २०१५ साली त्यांचे लग्न झाले. मात्र हे नाते केवळ १० महिने टिकू शकले. रेहम खान यांनी त्यांच्याच नावाने पुस्तक प्रकाशित केले. ज्यात इम्रान खान वैयक्तिक आयुष्यात कसे आहेत, याचे वर्णन केले.
इम्रान खान हे अंमली पदार्थांचे सेवन करतात, त्यांचे अनेक महिलांशी लैंगिक संबंध असून त्यातून अनौरस मुले जन्माला आली आहेत, तसेच त्यांना पुरूषांचीही ओढ होती, असे खळबळजनक दावे या पुस्तकात करण्यात आले आहेत.
भारतातही अनौरस मुले
रेहम खान पुस्तकात म्हणतात की, खुद्द इम्रान खान यांनीच त्यांची पाच मुले असल्याची माहिती मला दिली होती. ते म्हणाले, “टायरियन व्हाईट (इम्रान खान यांची मुलगी असल्याचा दावा) एकटी नाही. अशी पाच मुले आहेत. त्यापैकी काही भारतात असून सर्वात मोठी मुलगी ३४ वर्षांची आहे.”
एवढेच नाही तर इम्रान खान यांची पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनाही यातील काही मुलांबद्दल माहिती होती, असेही रेहम खान यांनी पुस्तकात म्हटले होते.
अंमली पदार्थांचे सेवन
इम्रान खान अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याच्या दाव्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली होती. मी कोकेनची नशा करतो याबद्दल तुला (रेहम) काळजी करण्याचे कारण नाही, असे इम्रान खान यांनीच मला सांगितले होते. इम्रान खान यांचा चुलत भाऊ त्यांना माझ्यासमोरच बंदी असलेली औषधे पुरवत होता. कोकेनचा परिणाम कमी करण्यासाठी ही औषधे वापरली जात होती.
पुरूषांमध्येही रस
रेहम खान यांच्या पुस्तकातील सर्वात धक्कादायक दावा होता तो इम्रान खान यांच्या लैंगिक आवडीनिवडीचा. आमच्या १० महिन्यांच्या लग्नात इम्रान खान यांना पुरूषांमध्येही रस असल्याचे मला जाणवले, असे त्यांनी पुस्तकात लिहिले आहे. यासाठी रेहम खान यांनी काही प्रसंगाचा दाखलाही दिला. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सकलेन मुश्ताकला ते गोंडस हास्य असलेला मुलगा म्हणायचे. तर स्वतःच्या पक्षाच्या एका खासदारावर ते भाळले होते, असाही दावा रेहम खान यांनी केला.

रेहम खान यांचे पुस्तक २०१८ साली प्रकाशित झाले होते. यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. इम्रान खान यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात काही नावांचा उल्लेख झाला आहे. कालांतराने त्या लोकांनी रेहम खानवर खटला दाखल केला.
इम्रान खान तीन वर्षांपासून तुरूंगात आहेत. त्यांना राजकीय पटलावरून बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. तरीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल इतक्या वर्षांनंतरही रस दाखवला जात आहे.
