Imran Khan Sons Allegation news: पाकिस्तानचे तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मुलांनी पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू असून यात कोणती माणुसकी आहे? असा प्रश्न त्यांची मुलं कासिम खान आणि सुलेमान खान यांनी उपस्थित केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
यात माणुसकी कुठे आहे?
इम्रान खान यांचे सुपुत्र कासिम खान यांनी ‘अल जझीरा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, “एखाद्या व्यक्तीला मूलभूत आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार न देणं, त्यांच्यावर क्षुल्लक छळ तंत्रांचा वापर करणं, त्यांना कोणतीही पुस्तके न देणं, त्यांच्या मुलांशी फोनवर बोलू न देणं आणि एका वेगळ्या कोठडीत कोंडून ठेवणं, यात माणुसकी कुठे आहे?”
वडिलांच्या आरोग्याविषयी पुरावा द्या
कासिम खान आणि त्यांचे बंधू सुलेमान यांनी त्यांच्या वडिलांच्या आरोग्याची स्वतंत्रपणे खात्री करून देणारा पुरावा मागितला आहे. सुलेमान खान म्हणाले, “या एकांतात डांबून ठेवण्यामुळे आणि दीर्घकाळ वेगळे ठेवल्यामुळे त्यांचा मानसिक छळ केला जात आहे. त्यांच्या आरोग्याची स्वतंत्रपणे समीक्षा व्हावी अशी आमची इच्छा आहे. जेणेकरून सरकार जे सांगत आहे की त्यांची प्रकृती ठीक आहे, त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम आहे, त्याचा पुरावा आम्हाला मिळेल.”
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने १८ ऑगस्ट रोजी इम्रान खान यांना वैद्यकीय मूल्यांकनासाठी ‘शिफा इंटरनॅशनल’ या खाजगी रुग्णालयात जाण्याची परवानगी दिली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांना सरकारी रुग्णालयातच नेलं, काही तासांच्या तपासणीनंतर त्यांना थेट पुन्हा त्यांच्या कोठडीत आणण्यात आल्याचाही आरोप मुलांनी केला आहे.
पाकिस्तानी सरकारने फेटाळले आरोप
दुसरीकडे, पाकिस्तानी सरकारने क्रिकेटपटू ते राजकारणी बनलेल्या इम्रान खान यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गैरवर्तन होत असल्याचा इन्कार केला असून, आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन करत असल्याचं म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितलं की, खान यांच्या खराब आरोग्याचं वृत्त तुरुंग किंवा वैद्यकीय नोंदींद्वारे प्रमाणित होत नाही. यावर सुलेमान म्हणाले, “मग ते काय लपवत आहेत? ते ठीक आहेत याचा पुरावा आम्हाला पाहायचा आहे.”
कासिम यांनी सांगितलं की इम्रान खान यांना हृदयाची धडधड जाणवत आहे. “त्यांना तीव्र चिंतेचा सामना करावा लागत आहे, जी आमच्यासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे.” ते पुढे म्हणाले, “ते मी पाहिलेले आतापर्यंतचे सर्वात शांत, निश्चिंत आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची चिंता किंवा तणाव जाणवत असल्याचं ऐकणं आमच्यासाठी अकल्पनीय आहे.”
जगाला सरकारचा भ्रष्ट चेहरा आणि कायद्याच्या सुशासनाचा त्यांचा पूर्ण अभाव दिसावा, यासाठी आपण आता शक्य तितका आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं कासिम म्हणाले. इम्रान खान यांना २०२२ मध्ये पंतप्रधानांच्या पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर २०२३ मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. बीबीसीच्या मते, त्यांच्यावर राज्याचे गुप्त दस्तऐवज लीक करण्यापासून ते राज्याच्या भेटवस्तू विकण्यापर्यंत १०० हून अधिक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. परंतु, त्यांनी हे सर्व आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत.
