मुंबईवरील २६/११ हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार झकीउर रेहमान लख्वी याला देण्यात आलेल्या जामिनाविरोधात अपील अर्ज दाखल करण्यात पाकिस्तान सरकार ‘अयशस्वी’ ठरले. इस्लामाबाद दहशतवादविरोधी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत पाकिस्तान सरकारला मिळवता आली नाही आणि म्हणूनच सरकारला या जामीन अर्जाविरोधात अपील करता आले नाही.
लख्वी याला १८ डिसेंबर रोजी इस्लामाबाद दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन दिला होता. मुंबई हल्लाप्रकरणी लख्वीविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे कारण न्यायालयाने या वेळी दिले होते. मात्र पेशावर येथील शालेय विद्यार्थ्यांवर अतिरेक्यांनी केलेल्या भीषण हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर या न्यायालयीन निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. भारतासह अनेक देशांनी यावर टीका केली. त्यामुळे पाकिस्तान सरकारने सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी सरकारने लख्वीची प्रत्यक्ष सुटका होण्यापूर्वीच त्याच्या कारावासात तीन महिन्यांनी वाढ केली.