अलीकडच्या काही महिन्यांपासून पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती वाईट झाली आहे. पीठ आणि डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील परकीय चलन संपत आलं आहे. पाकिस्तानाला जागतिक बँक आणि आपल्या मित्र देशांकडून मदतीची अपेक्षा आहे. अशात पाकिस्तानी जनतेचा आणखी एका धक्का बसला आहे. सरकारने पेट्रोलच्या किमतीत वाढ केली आहे.
देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशातच पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक डार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तानी नागरिकांना मोठा झटका बसला आहे.
हेही वाचा : श्रीनरमधील लाल चौकात राष्ट्रध्वजापेक्षा मोठ्या कटआउटमुळे राहुल गांधी ट्रोल
याबद्दल बोलताना इशाक डार म्हणाले की, “पाकिस्तानी रुपया सातत्याने घरसत आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रेलियम उत्पादनांच्या किंमतीत ११ टक्के वाढ झाली आहे. मागील चार महिन्यांपासून पेट्रोलच्या किमतीत वाढ करण्यात आली नव्हती. डिझेल आणि रॉकेलच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. मात्र, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निर्देशानुसार पेट्रोलच्या चार उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा : राहुल गांधींनी लाल चौकात फडकवला तिरंगा, अशी कामगिरी करणारे ठरले दुसरे काँग्रेस नेते
“पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर, रॉकेल आणि साधे डिझेलच्या दरात फक्त १८ रुपयांची वाढ केली आहे. तसेच, नवीन किमती जाहीर झाल्यानंतर, पेट्रोलचा पुरवठा बंद होणार, याच्या अफवा आता थांबतील,” असा विश्वास इशाक डार यांनी व्यक्त केला.
पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती ( १ लिटर )
- पेट्रोल – २४९.८० रुपये
- डिझेल – २६२.८० रुपये
- रॉकेल – १८९.८३ रुपये
- डिझेल ( साधे ) – १८७ रुपये