UK Parliament Report Pakistan Minority : पाकिस्तानातील हिंदू समुदायाच्या लोकसंख्येतील घट आणि धार्मिक अल्पसंख्याकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकणारा अहवाल ब्रिटनमधील हिंदू संघटना ‘इन्ससाइट युके’ने सादर केला आहे. २८ ऑक्टोबर रोजी ब्रिटिश हिंदूंसाठीच्या सर्वपक्षीय संसदीय गटासमोर हा अहवाल मांडण्यात आला. पाकिस्तानातील हिंदूंना धार्मिक भेदभाव, हिंसाचार, मालमत्तेवरील हक्क गमावण्याचा धोका आणि धार्मिक स्वातंत्र्यावरील मर्यादा यांचा सामना करावा लागत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. अल्पसंख्याकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी ब्रिटन सरकारने पाकिस्तानशी होणाऱ्या चर्चेत ठोस भूमिका घ्यावी, अशा पाच प्रमुख मागण्याही अहवालातून करण्यात आल्या आहेत. याबद्दल सविस्तर वृत्त विऑनने दिले आहे.

फाळणीपूर्वी १४.६ टक्के हिंदू लोकसंख्या; आता प्रमाण दोन टक्क्यांपेक्षा कमी

अहवालानुसार, १९४१ च्या भारताच्या जनगणनेत फाळणीनंतर पश्चिम पाकिस्तान बनलेल्या प्रदेशातील हिंदू लोकसंख्या १४.६ टक्के होती. फाळणीनंतरच्या दशकांमध्ये हे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. लोकसंख्येतील या बदलामागे केवळ आकडेवारी नसून, दीर्घकाळापासून सुरू असलेला हिंसाचार, विस्थापन आणि आर्थिक अडचणींची पार्श्वभूमी असल्याचा दावा ”इन्ससाइट युके”च्या अहवालात करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकार अल्पसंख्याकांच्या संरक्षणाबाबत आश्वासनं देत असलं, तरी प्रत्यक्ष परिस्थिती त्यापेक्षा वेगळी असल्याचं अहवालात म्हटलं आहे.

हिंसाचार आणि जमिनींच्या हक्कांबाबत गंभीर आरोप

१९४७ च्या फाळणीदरम्यान झालेल्या दंगलींपासून पाकिस्तानातील हिंदू समुदायाला वेगवेगळ्या काळात हिंसाचाराचा सामना करावा लागल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हिंसाचारामुळे किंवा विस्थापनामुळे हजारो हिंदू कुटुंबांना आपली घरं आणि जमिनी सोडाव्या लागल्या. त्यानंतर ‘एनिमी प्रॉपर्टी’ अर्थात शत्रूची मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आलेल्या जमिनी आणि शेतांवरील हक्क गमावल्यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती खालावल्याचा दावा संघटनेने केला आहे. या प्रक्रियेमुळे हिंदू समुदायातील अनेक कुटुंबांचं कायमस्वरूपी विस्थापन झालं आणि त्यांना गरिबीचा सामना करावा लागला, असं अहवालात म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या संविधानातील तरतुदींवरही आक्षेप

पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांना भेडसावणाऱ्या अडचणी केवळ सामाजिक पातळीवर मर्यादित नसून, देशाच्या कायदेशीर चौकटीतही असमानता असल्याचा आरोप अहवालात करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या संविधानातील कलम ४१ आणि ९१ नुसार, देशाचं राष्ट्रपती आणि पंतप्रधानपद भूषवण्यासाठी व्यक्ती मुस्लिम असणं आवश्यक आहे. या तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी २०१९ मध्ये प्रयत्न झाला होता, मात्र संबंधित सुधारणा विधेयक पुढे जाऊ शकलं नाही, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय, पासपोर्टमध्ये धर्माची माहिती देण्याची सक्ती आणि इस्लामाबादमध्ये हिंदूंचं कार्यरत मंदिर नसल्याचा मुद्दाही अहवालात उपस्थित करण्यात आला आहे. राजधानीत हिंदू मंदिर उभारण्याच्या प्रस्तावाला २०२० मध्ये इस्लामी कट्टरतावादी गटांच्या विरोधानंतर अडथळा निर्माण झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. अधिकृत परवानगी असूनही मंदिराचं बांधकाम पूर्ण होऊ शकलं नसल्याचा दावाही संघटनेने केला आहे.

दरवर्षी हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं अपहरण व सक्तीचं धर्मांतर?

पाकिस्तानातील हिंदू आणि ख्रिश्चन महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही अहवालात अधोरेखित करण्यात आला आहे. दरवर्षी या समुदायांतील सुमारे एक हजार किंवा त्याहून अधिक महिला आणि मुलींचं अपहरण केलं जातं, त्यांचं सक्तीने धर्मांतर घडवून आणलं जातं आणि अपहरणकर्त्यांशी त्यांचा जबरदस्तीने विवाह लावला जातो, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. या घटनांतील अनेक पीडित मुली अल्पवयीन आणि गरीब कुटुंबांतील असल्याचं अहवालात म्हटलं आहे. अशा प्रकरणांमध्ये पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

ब्रिटन सरकारकडे पाच प्रमुख मागण्या

पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटन सरकारने तातडीने पावले उचावीत, असे आवाहन ‘इन्ससाइट युके’ या संस्थेने केले आहे. या संदर्भात सादर करण्यात आलेल्या अहवालात ब्रिटन सरकारसमोर पाच प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये द्विपक्षीय चर्चेत अल्पसंख्याकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे, मंदिरांच्या संरक्षणासाठी कालमर्यादा निश्चित करणे, ब्रिटनची आर्थिक मदत मानवी हक्कांच्या प्रगतीशी जोडणे, इस्लामाबादमधील ब्रिटिश उच्चायुक्तालयात अल्पसंख्याकांसाठी दोन पदे राखीव ठेवणे, दर सहा महिन्यांनी अल्पसंख्याकांच्या स्थितीवर अहवाल प्रकाशित करणे आणि धार्मिक छळाला बळी पडलेल्यांना सुरक्षित आश्रय मार्ग उपलब्ध करून देणे या मागण्यांचा समावेश आहे.

पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबाबत ब्रिटन सरकारने अधिक ठोस भूमिका घ्यावी, हा या अहवालाचा मुख्य उद्देश आहे. मात्र, अहवालातील आरोप आणि शिफारशी या ‘इन्ससाइट युके’ या संघटनेने मांडलेल्या आहेत; त्यांची स्वतंत्र पडताळणी आणि पाकिस्तान सरकारची प्रतिक्रिया या मुद्द्यांवरही लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे.