पाकिस्तानातील नारोवाल परिसरात एका १०० वर्षांहून अधिक जुन्या ऐतिहासिक हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवर भारताने तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला असून या कृत्याचा कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. पाकिस्तान सरकारने या प्रकरणाची तात्काळ आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

‘अल्पसंख्याकांच्या सुरक्षेकडे पाकिस्तानचे दुर्लक्ष’

परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या घटनेबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली. “पाकिस्तानमधील नारोवाल जिल्ह्यातील सिरोज गावात एका ऐतिहासिक हिंदू मंदिराची तोडफोड झाल्याची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. अल्पसंख्याकांच्या एका शतक जुन्या प्रार्थनास्थळाची विटंबना आणि तोडफोड करणाऱ्या या घृणास्पद कृत्याचा भारत तीव्र निषेध करतो,” असे जयस्वाल यांनी म्हटले आहे.

स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवताना ते पुढे म्हणाले, “एका १०० वर्षे जुन्या मंदिराचे रक्षण करण्यात आलेले अपयश आणि तेथील प्रशासनाची उदासीनता अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याक समाज आजही किती असुरक्षित आहे आणि त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर तसेच प्रार्थनास्थळांवर कशा प्रकारे गदा आणली जात आहे, हेच या घटनेवरून पुन्हा एकदा उघड झाले आहे.”

मंदिराची पुनर्रचना करण्याची भारताची मागणी

भारताने पाकिस्तान सरकारला त्यांच्या वैधानिक आणि नैतिक जबाबदाऱ्यांची आठवण करून दिली आहे. पाकिस्तानने या प्रकरणाची त्वरित चौकशी करून गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा सुनावली पाहिजे; त्याचबरोबर, विटंबना झालेल्या या ऐतिहासिक मंदिराची त्वरित डागडुजी करून ते पूर्ववत करावे, अशी आक्रमक मागणी भारताने केली आहे.

आपल्या देशातील अल्पसंख्याक नागरिकांचे जीवन, त्यांची सुरक्षा, मालमत्ता आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करणे ही तेथील सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे, असा इशाराही नवी दिल्लीने इस्लामाबादला दिला आहे.