पाकिस्तानातील पंजाब प्रांतातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका स्थानिक व्यावसायिकाने १२५ वर्ष जुना ऐतिहासिक गुरुद्वारा जमीनदोस्त केला असून, या घटनेमुळे स्थानिक शीख समुदायामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. भारताने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, हा शीख धर्मियांच्या पवित्र स्थानावरील जाणीवपूर्वक केलेला हल्ला असल्याचे म्हटले आहे.
फारुखाबाद येथील ऐतिहासिक ‘गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा साहिब’वर झालेल्या या कारवाईनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान सरकारकडे तात्काळ चौकशीची आणि गुरुद्वाराच्या पुनर्बांधणीची मागणी केली आहे.
रात्रीच्या अंधारात कारवाई; प्रशासनाची परवानगीच नव्हती
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जूनच्या रात्री कोणत्याही प्रकारची प्रशासकीय परवानगी न घेता या ऐतिहासिक गुरुद्वारावर बुलडोझर फिरवण्यात आला. विशेष म्हणजे, स्थानिक शीख बांधवांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करेपर्यंत स्थानिक प्रशासन आणि ‘इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड’ने या गंभीर घटनेची दखलही घेतली नव्हती.

‘हा धार्मिक अल्पसंख्याकांवर पद्धतशीर अन्याय’
“पाकिस्तानातील फारुखाबाद येथे १२५ वर्ष जुना पवित्र गुरुद्वारा पाडल्याची बातमी अत्यंत क्लेषदायक आहे. शीख धर्मियांच्या श्रद्धेच्या स्थानावर झालेला हा हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. अशा घटना पाकिस्तानात नवीन नाहीत. तिथे धार्मिक अल्पसंख्याक आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.” – रणधीर जयस्वाल, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय (भारत)
भारताने पाकिस्तान सरकारकडे मागणी केली आहे की, या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शिक्षा दिली जावी आणि गुरुद्वाराचा पाडलेला भाग लवकरात लवकर पूर्ववत बांधून देण्यात यावा. तसेच, पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायाचे रक्षण करणे ही तेथील सरकारची जबाबदारी असल्याचेही भारताने ठणकावून सांगितले.
पाकिस्तानात शीख बांधवांचे आंदोलन; मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्याकडून दखल
लाहोरपासून साधारण ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागात गुरुद्वारा पाडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यानंतर शीख समुदायाने मोठ्या प्रमाणावर निषेध आंदोलने सुरू केली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी या प्रकरणाची दखल घेतली.
पंजाब प्रांताचे अल्पसंख्याक मंत्री रमेश सिंह अरोरा यांनी तातडीने फारुखाबाद येथील गुरुद्वाराला भेट दिली आणि येथील परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी स्थानिक शीख बांधवांशी चर्चा करून गुरुद्वाराच्या तात्काळ पुनर्बांधणीचे आश्वासन दिले आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांचा पुनर्बांधणीला विरोध; विस्थापनाची भीती
दरम्यान, या गुरुद्वाराच्या पुनर्बांधणीला स्थानिक मुस्लिम व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. व्यापाऱ्यांच्या मते, हा गुरुद्वारा गेल्या ८० वर्षांपासून ओसाड आणि पडीक अवस्थेत होता. या काळात तिथे अनेक कुटुंबे स्थायिक झाली असून अनेक दुकाने थाटली गेली आहेत. आता जर तिथे पुन्हा गुरुद्वारा उभारला गेला, तर अनेक कुटुंबे बेघर होतील. त्यामुळे सरकारने आधी या लोकांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे.
