पीटीआय, नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा धक्का दिला.  इम्रान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव रद्द करण्याचा ‘नॅशनल असेंब्ली’च्या उपसभापतींचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवला़  आता इम्रान यांना शनिवारी अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागणार असून, सत्तांतराचे स्पष्ट संकेत आहेत.

अल्पमतात आलेल्या इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव उपसभापती कासीम सुरी यांनी ३ एप्रिल रोजी रद्द केला होता़  इम्रान यांचे सरकार पाडण्याच्या कथित परकीय कटाशी या प्रस्तावाचा संबंध जोडून सुरी यांनी हा निर्णय दिला होता़  त्यानंतर काही मिनिटांतच पंतप्रधान इम्रान खान यांच्या शिफारशीनुसार अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी ‘नॅशनल असेंब्ली’ विसर्जित केली.

  या प्रकरणावर सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी गुरुवारी सलग पाचव्या दिवशी सुनावणी घेतली़  इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय बंदियाल यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांच्या खंडपीठाने घटनाबाह्य ठरवला़  तसेच ‘नॅशनल असेंब्ली’ विसर्जित करण्याचा निर्णयही घटनाबाह्य ठरवत न्यायालयाने इम्रान यांना धक्का दिला.  न्यायालयाने ‘नॅशनल असेंब्ली’ पूर्ववत करत ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अविश्वास प्रस्तावासाठी सत्र बोलावण्याचे आदेश सभापतींना दिल़े  हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नव्या पंतप्रधानांची निवड करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिल़े.

  इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानात राजकीय पेच निर्माण झाला होता़  त्याची स्वत:हून दखल घेत उपसभापती आणि अध्यक्षांचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन असतील, असे सरन्यायाधीश बंदियाल यांनी स्पष्ट केले होत़े.  या प्रकरणावर सलग पाच दिवस सुनावणी घेणाऱ्या सरन्यायाधीशांनी गुरुवारी दुपारी निकाल राखून ठेवला होता़  या प्रकरणात अध्यक्ष, उपसभापतींसह अन्य पक्षकारांच्या वकिलांनी बाजू मांडली़  सुरी यांचा निर्णय प्रथमदर्शनी अनुच्छेद ९५ चे उल्लंघन करत असल्याचे निरीक्षण सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान नोंदवले होत़े.

राजकीय जुळवाजुळव

सत्ताधारी तेहरिक-ए-पाकिस्तान पक्षाच्या काही सदस्यांबरोबरच घटकपक्षाच्या सदस्यांनी बंड पुकारल्यानंतर इम्रान खान सरकार अल्पमतात आल़े  आता शनिवारी त्यांना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागेल़  हा प्रस्ताव मंजूर झाल्यास विरोधी पक्षनेते, ‘पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज’चे नेते शेहबाज नवाज हे पंतप्रधान होऊ शकतील़  पाकिस्तान पीपल्स पक्षाचे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांनीही तसे संकेत दिले आहेत़ त्यादृष्टीने राजकीय जुळवाजुळव सुरू आहे.