इस्लामाबाद/ लाहोर : पाकिस्तानातील तीन राज्यांमध्ये सुरक्षा दलांनी स्वतंत्र कारवाईत ५२ अतिरेक्यांना ठार केल्याची माहिती लष्कर आणि अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. यातील बहुतांश अतिरेकी ‘तालिबान’शी संबंधित आहेत. पंजाब प्रांतात शुक्रवारी सहा, गुरुवारी बलुचिस्तान प्रांतात गुप्तचर यंत्रणांच्या दोन स्वतंत्र कारवाईत ४१ आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या (टीटीपी) एका कमांडरसह पाच दहशतवादी ठार झाले.

लाहोरपासून सुमारे ३०० किमी अंतरावर असलेल्या मियानवाली जिल्ह्यात हे दहशतवादी पोलिसांसह अन्य सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करणार असल्याची माहिती पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाला (सीटीडी) मिळाली होती. गुप्तचर यंत्रणांकडून येथील छपरी डॅम परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे ‘सीटीडी’तर्फे सांगण्यात आले.

सुरक्षा दलांनी कारवाईला सुरुवात करताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या वेळी सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात सहा अतिरेकी ठार झाले. तर इतर आठ जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. बलुचिस्तानातील हरनाई जिल्ह्याच्या बाहेरील भागात अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथेही सुरक्षा दलांनी कारवाई केली. या वेळी ३० अतिरेकी ठार झाल्याचे लष्कराने सांगितले. या ठिकाणाहून दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला.

पंजगुर जिल्ह्यातही सुरक्षा दलांनी कारवाई करत ११ अतिरेक्यांना ठार केले. या अतिरेक्यांकडून शस्त्रे, दारूगोळा, बँकेतून चोरी केलेली रक्कम हस्तगत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईत ‘टीटीपी’च्या कमांडरसह पाच अतिरेक्यांना ठार केले. यात तीन स्थानिक नागरिक ठार तर अन्य काही जण जखमी झाले.