Pakistan opens 6 land routes for Iran: शांतता चर्चेत प्रमुख मध्यस्थी म्हणून भूमिका बजावणारा पाकिस्तान उघडपणे इराणला मदत करत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी केल्याने इराणची चांगलीच कोंडी झाली आहे. पण, इराणला व्यापारी सहकार्य करण्यासाठी पाकिस्तानने हात पुढे केला आहे. पाकिस्तानने इराणला भूप्रदेशावरुन व्यापार करण्यासाठी सहा मार्ग उपलब्ध करुन दिले आहेत. याची इराणला रशिया, चीन आणि इतर राष्ट्रांशी व्यापार करण्यास मदत होणार आहे. पण, पाकिस्तानने इराणला केलेल्या मदतीमुळे अमेरिकेने संताप व्यक्त केला आहे.

पाकिस्तानच्या भूमिकेवर आक्षेप

पाकिस्तान अमेरिकेबरोबर दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. होर्मुझच्या नाकेबंदीमुळे हतबल झालेल्या इराणला पाकिस्तान सहा भूमार्ग उपलब्ध करुन दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानने देऊ केलेल्या सहा मार्गांची अधिकृत घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, अमेरिकेने पाकिस्तानच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा विशेषज्ञ डेरेक ग्रॉसमन यांनी याबाबत मत व्यक्त केले आहे. “पाकिस्तानच्या या सहा मार्गांमुळे अमेरिकेच्या इराणवर आर्थिक निर्बंध लादण्याचा प्रयत्नांना फटका बसणार आहे. या मार्गांतून इराण नाकेबंदीला न जुमानता सहज पद्धतीने इंधन व्यापर करु शकतो”, असे ग्रॉसमन म्हणाले.

डेरेक ग्रॉसमन यांची पोस्ट

“ट्रम्प प्रशासान, तुमच्या समोर एक समस्या आहे. तुमचा जवळचा मित्र पाकिस्तानने इराणसाठी सहा भूमार्ग उपलब्ध करुन दिलेत. अमेरिकेच्या होर्मुझमधील नाकेबंदीला फाटा देण्यासाठी पाकिस्तान त्यांना मदत करत आहे. यामुळे अमेरिकेच्या दबावाचा इराणला प्रतिकार करणे शक्य होणार आहे. इस्लामाबाद पुन्हा एकदा अमेरिकेबरोबर दुटप्पी भूमिका घेत आहे”, अशी एक्स पोस्ट डेरेक यांनी लिहली आहे.

योग्य मध्यस्थी नसल्याची भावना

यामुळे पाकिस्तानच्या मध्यस्थी म्हणून भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मध्यस्थी म्हणून पाकिस्तानवर विश्वास नसल्याचे मत यापूर्वी इस्रायलने व्यक्त केले आहे. अशात इराणला मार्ग उपलब्ध करुन देत सहकार्य केल्याने आता अमेरिकेकडून देखील पाकिस्तानच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला जात आहे. इराणने देखील पाकिस्तानच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली आहे. “पाकिस्तान इराणचा चांगला मित्र आहे पण, मध्यस्थी म्हणून योग्य नाही”, असे इराणचे राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते दाशतेस्तान यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या प्रयत्नांना छेद देण्याचा प्रयत्न

होर्मुझवरील नाकेबंदीच्या माध्यमातून अमेरिका इराणवर आर्थिक निर्बंध लादण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक दबाव वाढल्यास इराणला अमेरिकेचा प्रस्ताव मान्य करणे भाग पडेल, असे अमेरिकेचे मत आहे. पण, पाकिस्तानने सहा मार्ग उपलब्ध करुन दिल्याने हा ट्रम्प यांच्या प्रयत्नांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. शिवाय अमेरिकेची होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदी देखील निष्फळ ठरणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.