भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानचा संदर्भ कायमच दहशतवादी कारवाया आणि काश्मीरविषयी आक्रमक भूमिका याच बाबतीत येत असल्याचं दिसून येतं. मात्र, पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीविषयी चर्चा आणि तीही पाकिस्तानच्याच महसूल मंडळाच्या माजी अध्यक्षांच्या वक्तव्यामुळे सुरू झाली आहे. शब्बर झैदी असं त्यांचं नाव असून हॅम्बर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एका चर्चासत्रात बोलताना त्यांनी पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीविषयी सविस्तर भाष्य केलं आहे.

पाकिस्तानमध्ये सध्या दिवाळखोरीची परिस्थिती असून देश प्रगती करत असल्याचे दावे करत फसवणूक करण्यापेक्षा दिवाळखोरी मान्य केल्यास उपाय शोधायला मदत होईल, असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झाल्यानंतर आपण सविस्तर प्रेझेंटेशन दिलं असून फक्त ३ मिनिटांची क्लिपच चर्चेत आल्याची नाराजी त्यांनी ट्विटरवर बोलून दाखवली आहे.

लोकांना फसवण्यापेक्षा…

दरम्यान, यावेळी पाकिस्तानच्या प्रगतीविषयी दावे करणाऱ्या केंद्र सरकारचे आणि पंतप्रधान इम्रान खान यांचेही शब्बर झैदी यांनी कान टोचले आहेत. “मला वाटतं की पाकिस्तानचं दिवाळं निघालं आहे. अडचणीवर उपाय शोधण्यासाठी देशाचं दिवाळं निघाल्याचं मान्य करणं महत्त्वाचं आहे. देश प्रगती करतोय हा दावा करून लोकांना फसवण्यापेक्षा आर्थिक संकट मान्य करून त्यावर उपाय शोधणं जास्त चांगलं आहे”, असं झैदी म्हणाले.

१५ डिसेंबरला हे चर्चासत्र झाल्यानंतर त्यांचं वक्तव्य व्हायरल होऊ लागलं. त्यानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. “मी अर्ध्या तासाचं प्रेझेंटेशन दिलं होतं. पण त्यातला फक्त ३ मिनिटांचा भाग घेतला गेला. हो मी तसं म्हणालो होतो. सध्याची आर्थिक तुटीची परिस्थिती पाहाता आर्थिक संकट दिसून येत आहे. मी जे बोललो, त्याला आधार आहे”, असं झैदी यांनी म्हटलं आहे.