पाकिस्तानने आपले अण्वस्त्रनिर्मितीचे धोरण काहीसे बदलले असून हलक्या वजनाची व लहान आकाराची अण्वस्त्रे निर्माण करण्यावर भर दिला आहे. येथून प्रकाशित होणाऱ्या अ‍ॅटोमिक सायन्टिस्ट या नियतकालिकात याची माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानचा अण्वस्त्रनिर्मितीचा सपाटा पाहाता या बाबतीत लवकरच ते ब्रिटनलाही मागे टाकतील, अशी शक्यता यात वर्तविण्यात आली आहे.
अण्वस्त्रसज्ज होण्याचे पाकिस्तानचे उद्दीष्ट लपून राहिलेले नाही. अलीकडेच या देशाने आपल्या या बाबतच्या धोरणात काहीसा बदल केल्याचे दिसत असून हलक्या वजनाची व लहान आकारांची अण्वस्त्रे निर्माण करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. यामुळे त्यांच्या ताब्यातील अण्वस्त्रांची संख्या वाढत आहे, शिवाय ही अण्वस्त्रे क्षेपणास्त्रांवर बसविणे सोपे जाते, असे या अहवालात म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानकडे सध्या प्रत्येकी १०० अण्वस्त्रे असून इस्रायलसारख्या लहान देशाकडे २०० अण्वस्त्रे आहेत. ब्रिटनकडेही क्षेत्रफळाच्या मानाने बरीच म्हणजे २२५ अण्वस्त्रे आहेत, मात्र पाकिस्तानचा सपाटा आणि महत्त्वाकांक्षा पाहाता ते लवकरच ब्रिटनला मागे टाकतील, असा अंदाज यात वर्तविण्यात आला आहे.