Asaduddin Owaisi attacks PM Modi over Israel-Iran conflict: पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक तणाव निर्माण झाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये ऊर्जा संकट उभे राहिले. भारतातही सुरुवातीचे काही दिवस एलपीजीचा तुटवडा भासत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांपासून जगातील विविध देशांच्या प्रमुखांशी दूरध्वनीवरून संवाद साधून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान हैदराबादचे खासदार आणि एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मात्र युद्धावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. तसेच इस्रायल आणि पाकिस्तानलाही टोला लगावला.
औवेसी यांनी शुक्रवारी हैदराबादमधील मक्का मशिदीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात भारताने तटस्थतेची भूमिका घेतली असती तर शांतता प्रक्रियेत भारताच्या शब्दाला वजन प्राप्त झाले असते आणि भारताला मोठी नैतिक भूमिका बजावता आली असती.
एएनआय वृत्तसंस्थेने या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात औवेसी म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी काय केले? तर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या रांगेत जाऊन बसले आहेत. तुम्ही (पंतप्रधान मोदी) तटस्थ भूमिका घेतली असती तर कदाचित तुमच्या शब्दांना वजन प्राप्त झाले असते.”
पाकिस्तान आणि इस्रायल एका माळेचे मणी
इराण युद्धात पाकिस्तानने मौन बाळगून अप्रत्यक्षरित्या इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दलही औवेसी यांनी त्यांना टोला लगावला. ते म्हणाले, “आपला शेजारी पाकिस्तान हा इस्रायलचा धाकटा भाऊ वाटावा असा देश आहे. हे दोन्ही देश त्यांच्या शेजाऱ्यांना शांततेत जगू देत नाहीत. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला करून ४०० जणांचा बळी घेतला. त्यांना इस्लामची मूलतत्त्वेही माहीत नाहीत.”
“डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिका आणि इस्रायलचे नेतान्याहू यांना गाझाप्रमाणे इराणला नष्ट करायचा आहे. जर कुणाला वाटत असेल की इराणच्या विनाशानंतर हे सर्व थांबेल, तर तसे अजिबात होणार नाही. इराणनंतर तुर्कस्तानचा क्रमांक लागेल. मग पुढचा क्रमांक संपूर्ण अरब राष्ट्रांचा असेल”, असेही औवेसी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यावर टीका
इराणवर हल्ला होण्याच्या दोन दिवस आधी पंतप्रधान मोदींनी इस्रायलचा दौरा केला होता. यावरही औवेसी यांनी भाष्य केले. “मोदींचे मित्र नेतान्याहू यांनी त्यांना इस्रायलमध्ये निमंत्रित केले. पंतप्रधान मोदीही तिथे गेले. त्यांच्या दौऱ्यानंतर लगेच हल्ला झाला. यावर पंतप्रधान म्हणाले की, त्यांना याबद्दल कल्पना नव्हती. पण तिथे इराणवर हल्ला करण्याची आधीच योजना झाली होती. हे समजायला तुम्हाला रॉकेट शास्त्रज्ञ असण्याची गरज नाही”, अशी टीका औवेसी यांनी केली.
