ISI terror recruitment : ऑनलाइन गेमिंग संकेतस्थळांचा दहशतवादी कारवायांसाठी गैरवापर उघड झाल्यानंतर आता पाकिस्तानस्थित दहशतवादी आणि आयएसआयकडून भरतीसाठी आणखी वेगवेगळ्या ऑनलाइन माध्यमांचा वापर होत असल्याचे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या तपासात समोर आले आहे. दहशतवादी आता अश्लील संकेतस्थळावरील चॅट टूल्स आणि विशेष ॲप्सच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील संभाव्य भरतीबाबत संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय या गुप्त ऑनलाइन माध्यमांचा वापर भरतीशी संबंधित माहिती पोहोचवण्यासाठी आणि संपर्क साधण्यासाठी करत असल्याचे आढळले आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणांनी अशा संकेतस्थळांवर लक्ष केंद्रित केले आहे.
अश्लील संकेतस्थळावरील चॅट फीचरचा गैरवापर
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भारतात बंदी असलेल्या काही अश्लील संकेतस्थळे आणि ॲप्सवर विपीएनच्या माध्यमातून प्रवेश केला जातो. या संकेतस्थळांवर वापरकर्त्यांना जवळपासच्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी किंवा डेटिंगसाठी रिअल-टाइम चॅट सुविधा उपलब्ध असते. दहशतवादी हँडलर्स या सुविधांचा वापर संभाव्य भरतींपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी करत असल्याचे सुरक्षा यंत्रणांना आढळले आहे. यामुळे व्हॉट्सॲप, फेसबुक मेसेंजर आणि सिग्नलसारख्या लोकप्रिय माध्यमांपासून दहशतवादी नेटवर्क दूर जात असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
टॉर नेटवर्क आणि कूटबद्ध ॲप्स
सुरक्षा यंत्रणा अनेक विशेष डिजिटल माध्यमांची तपासणी करत आहेत. अहवालानुसार, काही दहशतवादी हँडलर्स टॉर-आधारित मेसेजिंग ॲप्सचा वापर करत आहेत. कोटेक्स आणि कोनियन यांसारख्या माध्यमांद्वारे कूटबद्ध नोड्समधून माहिती वळवली केला जात असल्याने वापरकर्त्याची ओळख लपवणे तुलनेने सोपे होते.
टॉर हे मुळात ऑनलाइन गोपनीयता आणि सेन्सॉरशिपपासून संरक्षणासाठी विकसित करण्यात आलेले मुक्त आणि ओपन-सोर्स नेटवर्क आहे. मात्र, त्याच्या अनामिकतेच्या सुविधांचा गैरवापर आता गुप्त नेटवर्ककडून होत असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोनियनच्या एपीकेवर भारतातून प्रवेश करण्यास निर्बंध असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. एपीके म्हणजे अँड्रॉइड ॲप्स घेण्यासाठी वापरले जाणारे फाइल फॉरमॅट.
फोन नंबरशिवायही संपर्क
सुरक्षा यंत्रणा अशा गोपनीयतेवर भर देणाऱ्या इतर माध्यमांवरही लक्ष ठेवून आहेत. काही ॲप्स सिम कार्ड किंवा फोन नंबरची आवश्यकता नसताना एंड-टू-एंड कूटबद्ध मेसेजिंगची सुविधा देतात. त्यामुळे एखाद्या वापरकर्त्याची ओळख निश्चित करणे तपास यंत्रणांसाठी अधिक कठीण ठरू शकते. व्हिएतनाम देशाशी संबंधित ॲप्स तसेच मूनचॅटसारख्या निनावी माध्यमांचाही सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत. काही आवृत्त्यांमध्ये पीजीपी एन्क्रिप्शनचा वापर होत असल्याचेही समोर आले आहे.
सुरक्षा यंत्रणांसाठी नवे आव्हान
सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, अशा गोपनीय संदेशवहन प्रणालींमुळे दहशतवादी संघटनांना संभाव्य तरुणांशी थेट संपर्क साधणे आणि त्यांची ओळख लपवणे सोपे होते. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये ऑनलाइन माध्यमातून होणारी दहशतवादी भरती रोखणे हे सुरक्षा यंत्रणांसमोरील महत्त्वाचे आव्हान बनले आहे.
ऑनलाइन खेळांच्या माध्यमांपासून आता अश्लील संकेतस्थळांवरील गप्पांच्या सुविधा आणि अत्यंत गोपनीय संदेशवहन करणाऱ्या ॲप्सपर्यंत दहशतवादी संघटनांनी संपर्काचे मार्ग बदलले आहेत. त्यामुळे या नव्या डिजिटल माध्यमांवर लक्ष ठेवून त्यांचा गैरवापर रोखण्याचे काम सुरक्षा यंत्रणांनी अधिक तीव्र केले आहे.
