पाकिस्तानच्या मंत्री मरियम औरंगजेब यांना लंडनमध्ये पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांचा सामना करावा लागला. एका कॉफी शॉपमध्ये इम्रान खान समर्थकांनी मरियम यांना उद्देशून ‘चोर चोर’ अशा घोषणा दिल्या. या घोषणाबाजीनंतर लंडनच्या रस्त्यावर काहींनी त्यांचा पाठलाग केला.

तालिबानींनी तुरुंगात डांबून आमचे केस कापले; ५५ शिखांचे अफगाणिस्तानातून भारतात आगमन

“पाकिस्तानातून लुटलेले पैसे घेऊन मरियम लंडनमध्ये फिरत आहेत” असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब अत्यंत शांतपणे पाकिस्तानी आंदोलकांचा सामना करताना दिसत आहेत. या व्हिडीओत इम्रान खान समर्थक मरियम यांच्यावर मेगाफोन्सच्या साहाय्याने ओरडताना दिसत आहेत. औरंगबेज निर्लज्ज आहेत, असे म्हणत एका महिला कार्यकर्त्याने यावेळी संताप व्यक्त केला. लंडनमधील हा व्हिडीओ पत्रकार एहतीशाम उल हक यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.

या आंदोलकांना मरियम यांनी संयम दाखवत सडेतोड उत्तर दिले. “तुम्हाला बहिण आणि आई असेल. त्यांची जर रस्त्यावर अशाप्रकारे कोणी हेटाळणी केली तर समाजात काय संदेश जाईल. या ठिकाणी जमलेले इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ पक्षाचे २० लोक मला शिवीगाळ करत आहेत. माझे नाव घेत आहेत. हा विरोध करण्याचा मार्ग असू शकत नाही”, असे मरियम या आंदोलकांना म्हणाल्या. तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा विरोध करायचा असल्यास तो तुम्ही मतदानाद्वारे करू शकता, असा सल्ला मरियम यांनी आंदोलकांना दिला.