पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात कथितरित्या बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत आणीबाणी लागू करण्यात आली असून, तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रांतीय सरकार बरखास्त झाले आहे. आणीबाणी लागू झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री सोहेल अफ्रिदी यांच्यासह ‘पीटीआय’च्या आठ नेत्यांना पोलिसांनी खबरदारीचे कारण देत ताब्यात घेतले. दरम्यान, आणीबाणी आणि राज्यपाल राजवटीच्या निर्णयाला पेशावर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी रविवारी राज्यघटनेतील अनुच्छेद २३२(१) आणि २३४(१) अन्वये आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली. वाढते दहशतवादी हल्ले आणि प्रांतातील घटनात्मक यंत्रणा कोलमडल्याचा दावा या निर्णयामागे करण्यात आला आहे. या निर्णयामुळे २०१३ पासून प्रांतात सत्तेवर असलेल्या पीटीआयच्या सरकारचा कारभार संपुष्टात आला.
आंदोलनादरम्यान नेत्यांना अटक
इम्रान खान यांची सुटका करावी आणि त्यांना वैद्यकीय उपचार मिळू द्यावेत, या मागण्यांसाठी ‘पीटीआय’ने माजी मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर आणीबाणी लागू करण्यात आली. त्यानंतर अफ्रिदी, खैबर पख्तुनख्वा विधानसभेचे अध्यक्ष बाबर सलीम स्वाती आणि पक्षाचे प्रांतीय अध्यक्ष जुनैद अकबर यांच्यासह आठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आणीबाणीनंतर पेशावरमधील परिस्थिती शांत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, प्रांतातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत फेरबदल करण्यात आले आहेत. मुख्य सचिव, सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
इम्रान खान यांच्या सुटकेसाठी मोर्चा
इम्रान खान यांच्या पक्षाने सुरुवातीला हा मोर्चा इस्लामाबादपर्यंत नेऊन तेथे धरणे आंदोलन करण्याचे नियोजन केले होते. मात्र, आंदोलकांना राजधानीत प्रवेश करू देणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. खान यांच्या पक्षाचे आणि केंद्र सरकारचे चर्चेचे दोन टप्पे निष्फळ ठरल्यानंतर हा मोर्चा काढण्यात आला.
