Operation Sindoor : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, या घटनेनंतर ६ मे रोजी रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाईला जोरदार प्रत्युत्तर दिलं. या कारवाईत भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत अचूक स्ट्राईक करून पाकिस्तान आणि पीओकेमधील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तान केलेल्या ड्रोन हल्ल्यांना देखील भारताने चोख प्रत्युत्तर दिलं.
भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान भारताने पाकिस्तानमधील रावळपिंडीतील नूरखान एअरबेस आणि शोरकोट एअरबेस या दोन महत्त्वाच्या हवाई तळांवर हल्ला केला होता. दरम्यान, भारताने पाकिस्तानच्या लष्करी हवाई तळांना भेदल्याचं याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज़ शरीफ़ यांनी विदेशी दौऱ्यावर असताना कबूल केलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशक दार यांनी देखील भारताने पाकिस्तानच्या लष्करी हवाई तळांना भेदल्याचं मान्य केलं आहे. तसेच सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या वतीने भारताशी संपर्क साधून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केल्याचंही जिओ न्यूजवर बोलताना इशक दार यांनी म्हटल्याचं वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
इशक दार यांनी म्हटलं की, पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असताना हवाई हल्ले झाले. दरम्यान याचा अर्थ भारताने तात्काळ कारवाई केली. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभीमीवर बोलताना इशक दार यांनी सांगितलं की भारताकडून होणारी लष्करी वाढ थांबवण्याच्या आशेने इस्लामाबादने अमेरिकेशी संपर्क साधला होता. आता इशक दार यांचा कबुलीजबाब पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि पाकिस्तानच्या इतर उच्च अधिकाऱ्यांनी केलेल्या पूर्वीच्या दाव्यांचेही खंडन करत असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी देखील स्वीकारलं की भारताने रावळपिंडी विमानतळासह अनेक क्षेत्रांना लक्ष्य करून ब्राह्मोस क्षेपणास्त्र हल्ल्यात वापर केला. भारताने पुन्हा ब्राह्मोस क्षेपणास्त्र हल्ले केले आणि रावळपिंडी विमानतळ आणि इतर ठिकाणी पाकिस्तानच्या विविध प्रांतांवर हल्ला केल्याचं शरीफ यांनी अलिकडच्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यांनी कबूल केलं की पाकिस्तानने १० मे रोजी पहाटे ४:३० वाजता प्रतिहल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र, ९-१० मे रोजी रात्री भारताने केलेल्या दुसऱ्या फेरीच्या हल्ल्यामुळे ही योजना उधळली गेली. यावरून असं दिसून येतं की भारतीय सैन्याने केवळ प्रथम हल्ला केला नाही तर त्यांनी पाकिस्तानचं प्रत्युत्तर यशस्वीरित्या रोखलं.