पाकिस्तानची परिस्थिती खूपच हलाखीची झालेली आहे. सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू घेणं देखील मुश्किल झालं आहे. महागाईने पाकिस्तानात उच्चांक गाठला आहे. पाकिस्तानातील जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. महागाईच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने तेथील जनता सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्येही नागरिक मोठ्या प्रमाणात आंदोलन करत रोष व्यक्त करत आहेत.
पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी एक भिती व्यक्त केली आहे. “जर व्यवस्था सुधारली नाही, तर हे ‘कॉक्रोच’ सर्व काही उलथवून टाकतील’, अशी मोठी भिती मोहसीन नक्वी यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता ‘कॉक्रोच’ची पाकिस्तानमध्येही दहशत निर्माण झाली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
भारतात मागील काही महिन्यांपासून ‘कॉक्रोच’ची मोठी चर्चा सुरू आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची स्थापना करत विद्यार्थ्यांनी थेट भारताच्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला. आता याच धर्तीवर पाकिस्तानात देखील एक ऑनलाइन चळवळ लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारलाही आता तरुणांच्या आंदोलनांची भीती सतावत असल्याचं स्पष्ट होत आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना भिती व्यक्त करत आपल्याच सरकारला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. “तुम्ही त्यांना तरुण म्हणा किंवा झुरळ किंवा आणखी दुसरं काही. मात्र, जर ते एकत्र आले तर ते सर्व काही उलथवून टाकू शकतात”, असं मोहसीन नक्वी यांनी म्हटलं. नक्वी यांचं हे वक्तव्य म्हणजे पाकिस्तानच्या आर्थिक अपयशाची मोठी कबुलीच आहे.
Breaking: Pakistan Interior Minister warns of "cockroach" uprising after India protests
— Shashank Mattoo (@MattooShashank) July 31, 2026
"We are unable to give our youth what they want. You can call them youth or cockroaches or whatever. But if these cockroaches get together, then they can overturn everything." pic.twitter.com/DYC5f67ri8
पाकिस्तानवर असलेल्या कर्जाचा आणि त्यातून सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नसल्याचा मुद्दा देखील नक्वी यांनी मांडला. मात्र, कर्जाची ही परिस्थिती सुधारणं हे आपलं कर्तव्य असल्याचं सांगत मोहसीन नक्वी यांनी त्यांच्याच सरकारवर टीका केली. नक्वी यांनी तरुणांमधील वाढत्या असंतोषाचा मुद्दा प्रामुख्याने अधोरेखित करताना ‘कॉक्रोच’ शब्दाचा उच्चार केला.
मोहसीन नक्वी यांनी काय म्हटलं?
“आपल्या तरुणांना जे हवं ते आपण त्यांना देऊ शकत नाही. तुम्ही त्यांना तरुण म्हणा, ‘कॉक्रोच’ म्हणा किंवा काहीही म्हणा. पण जर हेच ‘कॉक्रोच’ एकत्र आले, तर ते सर्व काही उलथवून टाकू शकतात. आपण ज्या व्यवस्थेत आहोत, ती कोलमडली आहे. तुम्ही ते मान्य करा किंवा करू नका. पण गेल्या ७० वर्षांपासून आपण ही व्यवस्था कशीतरी ओढत नेण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं मोहसीन नक्वी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मोहसीन नक्वी यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी शेअर केला आहे. मोहसीन नक्वी यांच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होत आहे की, आता पाकिस्तानमध्येही ‘जनरेशन झेड’ची दहशत निर्माण झाली आहे.
