अफगाणिस्तानातून आता अमेरिकी सैन्यही बाहेर निघालं असल्याने देश पूर्णपणे तालिबान्यांच्या ताब्यात आहे. या तालिबानी दहशतवाद्यांना सर्वाधिक समर्थन हे पाकिस्तानकडून मिळत असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानातल्या एक मंत्र्यांने हे पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. आम्ही तालिबानी नेत्यांची पाठराखण करत असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.

याबद्दल आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधल्या इमरान खान सरकारमधले मंत्री शेख राशीद म्हणाले की, आम्ही बराच काळ तालिबानी नेत्यांना संरक्षण दिलेलं आहे. आमच्याकडे ते शरणार्थी म्हणून आले होते. त्यांनी इथेच शिक्षण घेतलं आणि इथेच आपलं घर वसवलं. आम्ही तालिबानसाठी सर्वकाही केलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा – तालिबानचं अभिनंदन करताना ‘अल-कायदा’ने केला काश्मीरचा उल्लेख; म्हटलं, “इतर इस्लामिक प्रदेशही…”

पाकिस्तानकडून सातत्याने तालिबान्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांचं कौतुक करणारी विधाने केली जात आहेत. नुकतंच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनीही माहिती दिली होती की तालिबान काही दिवसातच देशात आपलं सरकार स्थापन करतील. त्यानंतर काही काळातच तालिबाननेही याची पुष्टी केली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आधीही तालिबानच्या समर्थनार्थ अनेकदा विधानं केली होती.

फक्त नेतेच नाही तर पाकिस्तानच्या खेळाडूंनीही तालिबान्यांचं समर्थन केलं आहे. माजी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदीने नुकतंच एक वक्तव्य केलं की तालिबान यावेळी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आला आहे. ते महिलांना काम करण्याची परवानगी देत आहेत आणि क्रिकेटचंही समर्थन करत आहेत.