पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एका हृदयद्रावक घटनेनं सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. १३ आणि १४ वर्षे वयोगटातील दोन अल्पवयीन हिंदू बहि‍णींची आर्त विनवणी पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. या बहिणींनी आपल्या पालकांकडे परतण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, न्यायालयाने त्या दोन्ही मुलींना सुरक्षित निवारा केंद्रात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या दोन अल्पवयीन हिंदू मुलींचं अपहरण करून त्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एका न्यायालयाबाहेर या दोन हिंदू बहिणींना त्यांच्या पालकांबरोबर घरी पाठवण्यास न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्या भावूक होऊन रडत होत्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कच्छी कोल्ही समाजातील दोन बहिणींचं अपहरण करून त्यांचं धर्मांतर करत अमजद व मन्सूर यांच्याशी त्यांचं लग्न लावून देण्यात आल्याचा आरोप या मुलीच्या कुटुंबीयांनी केला. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

वृत्तानुसार, सिंधमधील टंडो अल्लाहयार जिल्ह्यातील न्यायालयाने या बहिणींना सुरक्षित निवारा केंद्रात हलवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी न्यायालयाबाहेर या दोन बहिणी “आम्हाला घरी जायचं आहे”, अशी विनवणी करत रडताना दिसून आल्या आहेत. हा व्हिडीओ पाकिस्तानी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या सोरथ सिंधू यांनी एक्सवर (ट्विटर) शेअर केला.

दरम्यान, मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संघटनेने म्हटलं की, पाकिस्तानातील शेकडो तरुण हिंदू महिलांना अपहरण, बळजबरीने धर्मांतर आणि बळजबरीने विवाह या सारख्या घटनांना सामोरं जावं लागत आहे. दरम्यान, “आपली मातृभूमी सोडण्यास तयार नसलेल्या हिंदू सिंधींना लक्ष्य करणारी ही एखादी सरकारी पाठिंबा असलेली टोळी आहे का? कारण जर ही आणीबाणीची परिस्थिती नसेल, तर मग आणीबाणी कशी असते? आमच्या मुलींना वाचवा”, अशी पोस्ट पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्त्या सोरथ सिंधू यांनी एक्सवर केली आहे.

दरम्यान, पाकिस्तानमधील बहुतांश हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात वास्तव्यास आहे. हिंदू मुलींचं अपहरण, धर्मांतर आणि मुस्लिम पुरुषांशी विवाह लावून देणं या सारख्या तक्रारींचं प्रमाण खूप जास्त आहे. कोल्ही, भिल आणि मेघवार या सारख्या उपेक्षित समाजातील गरीब कुटुंबे विशेषतः असुरक्षित आहेत. कारण त्यांना पोलीस, न्यायालये, कायदेशीर मदत आणि प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व मिळणं कठीण असतं. पाकिस्तानमध्ये त्यांना मतदानाच्या अधिकारापासूनही जवळपास वंचित ठेवले गेल्याचा आरोप केला जात आहे.