Pakistan missile attack on Afghanistan: पाकिस्तानने अफगाणिस्तानवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने सोमवारी केलेल्या या हल्ल्यात अफगाणिस्तानमधील तीन जणांचा मृत्यू झाला असून, ४५ जण जखमी झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. वृत्तातील अधिकच्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या उत्तर-पूर्व भागात हा हल्ला झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
कुनार प्रांतात हल्ला
कुनार प्रांताचे माहिती आणि संस्कृती विभागाचे प्रमुख नजीबुल्लाह हानिफ यांनी या हल्ल्याबाबत टोलो न्यूजला माहिती दिली आहे. सोमवारी पाकिस्तानकडून हल्ला झाला यात तीन जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या या हल्ल्याबाबत पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
मार्चपासून संघर्ष
समोर आलेल्या आंतरराष्ट्रीय माध्यमातील वृत्तानुसार, कुनार प्रांतातील, असदाबाद शहरावर हा हल्ला झाला आहे. हा भाग पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांताला लागून आहे. मार्च महिन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्षाला सुरुवात झाली. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर अफगाणिस्तानकडून प्रत्युत्तरदाखल पाकिस्तानी सीमेवर हल्ला केला होता. यानंतर सीमेवर देखील दोन्हीकडील शेकडो जवान, नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते.
ईदच्या निमित्ताने युद्धविराम
ईदच्या निमित्ताने दोन्ही देशांनी काही काळासाठी युद्धविरामाची घोषणा केली होती. महत्वाच्या मुस्लिम समुदायाच्या या सनानिमित्ताने काबुल आणि इस्लामाबादने शस्त्रसंधी करण्याची तयारी दर्शवली. तुर्किये, सौदी अरेबिया आणि कतारने या शस्त्रसंधीसाठी पुढाकार घेतला होता. यानंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चीनमध्ये शांतता चर्चा देखील आयोजित करण्यात आली होती.
शांतता चर्चा फिस्कटण्याची शक्यता
समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये बीजिंगमध्ये शांतता चर्चा झाली. यावेळी पाकिस्तानने चर्चेतून तोडगा काढण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, चर्चा सुरु असताना पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे दोन्ही देशातील संबंध पुन्हा बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
