पाकिस्तानला नवे राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) डॉ आरिफ अलवी यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच भारताशी आणि खास म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याशी कनेक्शन आहे. डॉ आरिफ अलवी यांचे वडील डॉ हबीब उर रेहमान इलाही अलवी एक डेन्टिस्ट होते. डॉ आरिफ अलवी यांच्या आत्मचरित्रात असलेल्या उल्लेखानुसार त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरु यांचे वैयक्तिक डेन्टिस्ट होते. पीटीआयच्या वेबसाइटवर डॉ आरिफ अलवी यांचे आत्मचरित्र उपलब्ध आहे. अलवी कुटुंबाकडे जवाहरलाल नेहरु यांनी डॉ हबीब यांना लिहिलेली पत्रंही उपलब्ध आहेत.

‘डॉ आरिफ अलवी यांचे वडील डॉ हबीब उर रेहमान इलाही अलवी यांनी भारतात डेन्टिस्ट म्हणून प्रॅक्टिस केली. १९४७ ला फाळणीनंतर ते पाकिस्तानात आले. कराचीमधील सद्दार येथे त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरु ठेवली. डॉ हबीब जवाहरलाल नेहरुंचे डेन्टिस्ट होते. डॉ हबीब अलवी यांना नेहरुंनी लिहिलेली पत्रं त्यांच्या कुटुंबाकडे आहेत’, अशी माहिती पीटीआयच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

डॉ आरिफ अलवी हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे जवळचे सहकारी आहेत. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक आहेत. पाकिस्तान पिपल्स पार्टीचे उमेदवार ऐतजाज खान यांचा सलग तीन वेळा डॉ आरिफ अलवी यांनी पराभव केला आहे.

डॉ आरिफ अलवी पाकिस्तानचे १३ वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. यासोबत ज्यांचे पूर्वज भारतीय होते असे पाकिस्तानचे ते तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत. याआधीचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसैन यांचे पूर्वजदेखील भारतात होते. हुसैन यांचं कुटुंब उत्तर प्रदेशातील आग्रा येथे वास्तव्यास होतं. नंतर ते पाकिस्तानात स्थलांतरित झाले. माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं कुटुंब भारतातून स्थलांतरित झालं होतं. मुशर्रफ यांचं कुटुंब फाळणीआधी दिल्लीत वास्तव्यास होतं. डॉ आरिफ अलवी यांचा जन्म मात्र पाकिस्तानात झाला आहे. त्यांचे वडील फाळणीनंतर सिंध येथे स्थिरावले. नंतर त्यांनी कराचीत आपला दवाखाना सुरु केला. अलवी कुटुंबाचे पाकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अली जिना यांच्या कुटुंबाशीदेखील संबंध आहेत. जिना यांची बहिण शिरीनबाई जिना यांनी डॉ हबीब यांना आपल्या ट्रस्टचं ट्रस्टी केलं होतं.