पाकिस्तानमध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेलं राजकीय नाट्य अखेर तात्पुरतं का होईना, संपलं आहे. इम्रान खान यांचं सरकार गडगडल्यानंतर पाकिस्तानला शहबाझ शरीफ यांच्या रुपानं नवे पंतप्रधान मिळाले आहेत. इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ या पक्षानं शहबाझ शरीफ यांच्या निवडीवर आणि पाकिस्तानमधील नव्या सरकारच्या स्थापनेवर तीव्र निषेध व्यक्त करतानाच बहिष्कार घातला आहे. एकीकडे इम्रान खान यांच्या पक्षाचे सदस्य संसद सदस्यत्वाचा राजीनामा देणार असताना दुसरीकडे शहबाझ शरीफ यांची नव्या सरकारची व्यवस्था लावण्याची गडबड दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या शुभेच्छांना शहबाझ शरीफ यांनी सूचक उत्तर दिलं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक दशकांचा तणावपूर्ण इतिहास राहिला आहे. त्यात नेहमीच भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या इम्रान खान यांच्या जागी शहबाझ शरीफ आले आहेत. त्यांनी पंतप्रधान झाल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात काश्मीर मुद्द्याचा उल्लेख करून आक्रमक भूमिका मांडल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून त्यांना दिलेल्या शुभेच्छांची चर्चा सुरू झाली होती. त्यातच आता शरीफ यांनी उत्तरादाखल दिलेल्या ट्वीटवरून देखील तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ
rajnath singh on pakistan
‘घरात घुसून मारू’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तानचा जळफळाट
sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा!

“पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल एच. ई. मियान मोहम्मद शहबाझ शरीफ यांचं अभिनंदन. भारताला या प्रांतामध्ये शांतता आणि स्थैर्य अपेक्षित असून हा प्रांत दहशतवादमुक्त राहील अशी अपेक्षा आहे. असं झाल्यास आपण विकासकामांमधील आव्हानांवर लक्ष केंद्रित करु शकू आणि त्या माध्यमातून आपल्या लोकांचं भलं करण्याबरोबरच संपन्नता प्रदान करता येईल,” अशा शब्दांत मोदींनी शरीफ यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या होत्या.

शरीफ यांचं उत्तर!

दरम्यान, शहबाझ शरीफ यांनी आज दुपारी पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छांना उत्तर दिलं आहे. मोदींचे आभार मानतानाच शरीफ यांनी सूचक शब्दांत काश्मीरचा उल्लेख न करता आपली भूमिका मांडली आहे.

“पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. पाकिस्तानची इच्छा आहे की भारतासोबत शांततापूर्ण आणि सहकार्याचे संबंध राहावेत. दोन्ही देशांमधील जम्मू-काश्मीरसारख्या अनेक प्रलंबित मुद्द्यांवर शांततापूर्ण पद्धतीने मार्ग निघणं अपरिहार्य आहे. दहशतवादाशी लढा देताना पाकिस्ताननं दिलेलं बलिदान सर्वश्रुत आहे. आता आपण शांततेसाठी प्रयत्न करुयात आणि आपल्या जनतेच्या सामाजिक-आर्थिक विकासावर लक्ष केंद्रीत करुयात”, असं शरीफ आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

पाकिस्तानात नेमकं घडलं काय?

देशातील ढासळत्या अर्थव्यवस्थेसाठी तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांना दोषी ठरवत विरोधकांनी अविश्वास ठराव मांडला. याआधी इम्रान खान यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी आपला पाठिंबा काढल्याने त्यांचं सरकार अल्पमतात आलं होतं. या ठरावावर शनिवारी मतदान घेण्यात आलं. या मतदानात अपेक्षेप्रमाणे इम्रान खान यांचा पराभव झाला आणि शेहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार हे निश्चित झालं. सोमवारी शरीफ यांनी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.