Pakistan Terror Attack: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पंजाबहून आलेल्या बसमधील प्रवाशांना खाली उतरवून त्यांना गोळ्या झाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्राच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भतलं वृत्त दिलं आहे. पाकिस्तानच्या मुसाखेलमधील राराशम जिल्ह्यात ही घटना घडला. या प्रकाराचा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ व राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी निषेध केला असून देशात कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला थारा नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

राराशम जिल्ह्यातल्या आंतरप्रांतीय महामार्गावर ही घटना घडली. या महामार्गावरून जाणाऱ्या अनेक बसेसमधून हल्लेखोर प्रवाशांना खाली उतरवत असून त्यांच्यावर हल्ले करत आहेत, अशी माहिती या प्रांताचे सहायक्क आयुक्त मुसाखेल नजीब काकर यांनी दिली आहे.

“पाकिस्तानमधील पंजाब प्रांताकडे जाणाऱ्या व पंजाब प्रांतातून येणाऱ्या बसेसला हल्लेखोर प्रामुख्याने लक्ष्य करत आहेत. या बसेसची तपासणी हल्लेखोरांकडून केली जात आहे. त्यानंतर फक्त पंजाब प्रांतातून आलेल्या नागरिकांना गोळ्या घातल्या जात आहेत”, अशी माहिती काकर यांनी डॉन वृत्तपत्राला दिल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. आज हत्या करण्यात आलेल्या २३ जणांपैकी तिघेजण बलुचिस्तानचेच होते, तर उर्वरीत २० जण हे पंजाब प्रांतातून आले होते, अशीही माहिती त्यांनी दिली.

हल्लेखोरांनी १० ट्रक पेटवले!

दरम्यान, या भागातील उपायुक्त हमीद झहीर यांनी हल्लेखोरांनी १० ट्रक पेटवून दिल्याची माहिती दिली. या ट्रकच्या चालकांचीही हल्लेखोरांनी हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह नजीकच्या रुग्णालयात हलवले.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं घेतली जबाबदारी

या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं घेतली आहे. मात्र, आमच्या लोकांनी फक्त साध्या वेशात प्रवास करणाऱ्या लष्करी अधिकारी व सैनिकांना लक्ष्य केलं आहे, असा दावा त्यांनी केला आहेत. त्यांना गोळ्या घालण्याआधी त्यांची ओळख पटवण्यात आली होती, असंही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला असून मृत्यू पावलेले लोक निरपराध नागरिक होते, असं ते म्हणाले आहेत.

Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला; दोन गटात तुफान राडा, ५० जण जखमी

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केला निषेध

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. “पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही”, असं ते म्हणाले. यावेळी शरीफ यांनी स्थानिक प्रशासनाला मृतांच्या नातेवांईकांना लागेल ती मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जखमींना शक्य ती सर्व मदत करण्यासही त्यांनी सांगितलं आहे.

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी हा मानवतेवरचा हल्ला असल्याचं नमूद करून हल्लेखोर हे पाकिस्तान व मानवता या दोघांचे शत्रू असल्याची टीका केली आहे.

याआधीही एप्रिल महिन्यात अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला होता. मुसाखेलमधील नोशकी भागात ९ प्रवाशांना एका बसमधून खाली उतरवून त्यांची ओळखपत्र तपासण्यात आली व त्यानंतर त्यांना गोळ्या झाडून ठार करण्यात आलं होतं.