Asha Bhosle Death Pakistan Geo News Controversy: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्बल सहा दशके त्यांनी आपल्या मधुर आवाजाने हिंदीसह अनेक भाषांत गाणी गायली होती. त्यांच्या निधनानंतर जगभरातील कला क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. पाकिस्तानमधील जीओ न्यूज या वृत्तवाहिनीनेही आशा भोसले यांच्या निधनाबद्दलचे वार्तांकन केले होते. मात्र आता वाहिनीला नोटीस बजावण्यात आली आहे. माध्यमांचे निरीक्षण करणाऱ्या पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणने (PEMRA) जीओ न्यूज चॅनेलला नोटीस बजावून त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानचे वृत्त डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार भारताशी संबंधित सामग्री टीव्हीवर दाखविण्यास बंदी घातलेली आहे. जीओ न्यूजने आशा भोसले यांच्या निधनाचे वार्तांकन करत असताना भारतीय चित्रपटातील गाणी आणि काही चित्रपटांचे व्हिडीओज वापरले होते. यावरून ही नोटीस बजावली गेली.

जिओ न्यूज उर्दूचे व्यवस्थापकीय संचालक अझर अब्बास यांनी या नोटीशीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, महान कलाकारांबाबत वार्तांकन करत असताना त्यांच्या कार्याचा आणि जीवनाचा आढावा घेताना त्यांचा गौरव करणे, ही वार्तांकनाची परंपरा राहिली आहे. खरंतर आशा भोसले यांच्या दर्जाच्या कलाकारबद्दल वार्तांकन करत असताना आता जेवढी गाणी दाखवली गेली, त्याहून अधिक ती दाखवायला हवी होती.

तरीही पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्राधिकरणाने त्यावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला. ज्ञानाप्रमाणेच कलाकडेही मानवतेचा वारसा म्हणून पाहायला हवे. कलेला सीमांमध्ये मर्यादित करणे योग्य होणार नाही. आशा भोसले या स्वतः पाकिस्तानच्या महान गायिका नूरजहाँ यांच्यापासून प्रेरित होत्या. त्या त्यांना आपली मोठी बहीण मानत, असेही अब्बास यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले.

आशा भोसले यांनी पाकिस्तानी कलाकार नुसरत फतेह अली खान यांच्याबरोबर काम केल्याचीही आठवण अब्बास यांनी करून दिली. तसेच युद्ध आणि तणावाच्या काळात कला आणि कलाकार यांचा बळी देता कामा नये, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अझहर अब्बास पुढे असेही म्हणाले, विचारवंत, संगीतकार आणि सृजनशील कलाकार हे नेहमीच द्वेष आणि विभाजनवादी विचारांच्या विरोधात आवाज उचलण्याचे काम करत असतात. तसेच ते लोकांना एकत्र आणण्याचेही काम करतात.

पाकिस्तानी पत्रकार रौफ क्लासरा यांनीही अझहर अब्बास यांच्या पोस्टवर मत व्यक्त केले. आशा भोसले यांच्यासारख्या वरिष्ठ गायिकेच्या निधानाचे वार्तांकन केल्याबद्दल PEMRA वृत्तवाहिनीला नोटीस कशी देऊ शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “आशा भोसले यांनी आपल्या मधुर आवाजाने उपखंडातील अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले. त्या आदरास पात्र आहेत”, असे उद्गार रौफ क्लासरा यांनी काढले.

जिओ न्यूजचे वरिष्ठ पत्रकार एजाज सय्यद यांनीही पेमराच्या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले, पाकिस्तानच्या मुख्य प्रवाहातील माध्यमांवर अशाप्रकारचे अभूतपूर्व नियंत्रण यापूर्वी कधीही पाहिले गेले नाही. आशा भोसले यांच्यासारख्या कलाकाराच्या निधनानंतर केलेल्या वार्तांकनाला जर नोटीस दिली जात असेल तर हे खूपच अयोग्य आहे. माध्यमांनी नेहमीच जबाबदारीने आपले काम पार पाडले आहे. स्वतःला राष्ट्रभक्त म्हणवून घेणारे काही लोक माध्यमांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करून माध्यमांना देशविरोधी दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत.

आणखी एक पाकिस्तानी पत्रकार घरिदा फारुकी यांनीही पेमराच्या निर्णयावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “कला आणि संस्कृतीला सीमांच्या बंधनांत अडकवता येणार नाही. कृपया आम्हाला ८० च्या दशकातील जनरल झिया यांच्या जाचक राजवटीत पुन्हा नेऊ नका. त्या काळात व्हीसीआर आणि चित्रपट बाळगणेही शिक्षेस पात्र गुन्हा होता. आजचे युग हे नेटफ्लिक्स आणि एआयचे युग आहे. या काळात लोकांना मूर्ख बनविता येणार नाही.”

शांतता दलालांचा क्षुद्रपणा

मानवाधिकार पत्रकार अलिफ्या सोहेल यांनी तर पेमराच्या निर्णयावर कठोर टिका करत असताना इराण आणि अमेरिका-इस्रायल युद्धात शांतता करार करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या पाकिस्तान सरकारची लाज काढली. शांततेसाठी दलाली करणाऱ्यांचा क्षुद्रपणा या निर्णयातून समोर आला असल्याची जहरी टीका त्यांनी केली.

दुसरे पत्रकार कामरान युसूफ म्हणाले की, ज्यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे, त्यांनी सीमेपलीकडील आशा भोसले आणि इतर कलाकारांची गाणी एकदा ऐकावित. माजी माहिती व प्रसारण मंत्री आणि पीटीआयचे सिनेटर फवाद हुसैन यांनी तर पेमरावर टीका करताना अशिक्षित मानसिकतेची सध्या चलती आहे, अशी उपरोधिक टीका केली.