Operation Sindoor Pakistan Nur Khan Airbase: ऑपरेशन सिंदूरमध्ये नुकसान झालेल्या नूर खान विमानतळावर पाकिस्तानी लष्कराने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. भारतीय लष्कराने गेल्यावर्षी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये नूर खान विमानतळाचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर आता पाकिस्तानने विमानतळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सध्याच्या घडीला विमानतळावर बांधकाम सुरु असून, या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षेचा बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. लष्करी मुख्यालयाच्या शेजारीच असणारे नूर खान विमानतळ पाकिस्तानसाठी अतिशय महत्वाचे मानले जाते. एक वर्षानंतर देखील विमानतळावर सुरु असणारे बांधकाम ऑपरेशन सिंदूरमध्ये त्याचे मोठे नुकसान झाल्याचा पुरावा असल्याचे स्पष्ट होते.
सॅटेलाईट फोटो समोर
रावळपिंडी येथील या विमानतळावर बांधकाम सुरु असल्याचे सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत. जिओ इंटेलिजन्स एक्सपर्ट डामेन सायमन यांच्यावतीने हे फोटो सार्वजनिक करण्यात आले आहेत. नियमितपणे करावे लागणारे हे दुरुस्तीकाम नाही तर असे दिसते, असेही सायमन यांनी स्पष्ट केले आहे. विमानतळावरील घडामोडी आणि इतर गोष्टींची माहिती मिळू नये यासाठी हे बांधकाम केले जात असल्याचे सांगितले जाते. भारतीय यंत्रणांना विमानतळावरील हालचाली पाहता येऊ नये, असाही यामागील उद्देश असल्याची माहिती आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये विमानतळाचे नुकसान
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरु केले होते. भारताने केलेल्या या हल्ल्यांमध्ये ११ दहशवादी आणि लष्करी तळांवर अचूक निशाणा साधला. यामध्ये पाकिस्तानच्या नूर खान विमानतळाला देखील लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून हा हल्ला केवळ २५ किलोमीटरच्या अंतरावर झाला होता. दोन्ही देशांमध्ये संघर्ष वाढल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीची मागणी केली होती. नूर खान विमानतळ पाकिस्तानसाठी अतंत्य महत्वाचे मानले जाते. लष्करी कामकाज आणि शासकीय कामांसाठी देखील हे विमानतळ खास आहे.
नूर खानचे लष्करी महत्व
भारताकडे असणाऱ्या अद्यावत तंत्रज्ञानाच्या मदतीने पाकिस्तानमधील लष्करी तळ आणि विविध महत्वाच्या ठिकाणांवर लक्ष ठेवता येऊ शकते. ऑपरेशन सिंदूरमध्ये हेच दिसून आले आल्याचे सांगितले जाते. नूर खान विमानतळावर पाकिस्तान आता मजबूत आणि मोठे हँगर उभारत आहे. पडताळणी करणाऱ्या प्राणालींना यामुळे तळावर लक्ष ठेवता येऊ नये असा यामागे उद्देश आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरमध्ये या विमानतळावरील संरक्षणासाठीचे हँगर, इंधन ट्रक आणि रनवेचे नुकसान झाले. दरम्यान, पाकिस्तानमध्ये शांतता चर्चेसाठी आलेली अमेरिकी आणि इराणचे शिष्टमंडळ याच विमानतळावर उतरले होते.
