Rajnath Singh in Kargil Vijay Diwas Event “पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहिल”, अशा तीव्र शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दम दिला आहे. कारगिल विजय दिवसानिमित्त जम्मूमधील गुलशन मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारगिल युद्धातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारताच्या संसदेत पाकव्याप्त काश्मीरबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. शिवरुप बाबा अमरनाथ आपल्याकडे आणि आई शारदा शक्ती स्वरुप नियंत्रण रेषेच्या पलीकडे (पाकव्याप्त काश्मीरमध्ये) हे कसं असू शकते असा प्रश्नही सिंह यांनी विचारला.

मजबूत आणि आत्मविश्वासाने भरलेला नवा भारत सज्ज

देशावर वाईट नजर टाकणाऱ्यांना त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी एक मजबूत आणि आत्मविश्वासाने भरलेला नवा भारत सज्ज आहे. भारताला जागतिक महासत्ता बनवणे ही आपल्या शहिदांना वाहिलेली खरी श्रद्धांजली असेल, असेही सिंग म्हणाले. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील लोकांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे. कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी जम्मू आणि काश्मीर पीपल्स फोरमच्या पुढाकाराचे मी कौतुक करतो. आमच्या सुरक्षा दलांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. मात्र, स्वातंत्र्यानंतर जम्मू आणि काश्मीर, लडाख सारखे प्रदेश युद्धभूमी बनली असल्याची खंत सिंह यांनी व्यक्त केली.

विरोधाला झुगारुन भारताची अणुचाचणी

१९७१ मध्ये पाकिस्तानचा भारताने दारुण पराभव केला. आमच्या सैन्याने पाकिस्तानी सैन्याला आत्मसमर्पण करायला लावले. पाकिस्तान आमचा शेजारी आहे. आम्हाला आमच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे आहेत. अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे, की आम्ही मित्र बदलू शकतो पण शेजारी नाही. आम्हाला वाटलं पाकिस्तान सुधारेल मात्र, तसं काहीही झालं नाही. पराभवानंतर पाकिस्तानाच्या कुरघोडी चालूच आहेत. १९८८ मध्ये भारताने दुसरी अणुचाचणी घेतली. त्यावेळी भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होती. या चाचणीला संपूर्ण जगातून विरोध करण्यात आला होता. मात्र, वाजपेयी यांनी विरोधाला न जुमानता अणुचाचणी घेतली असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितलं.