फाळणीच्या ७२ वर्षांनंतर पाकिस्तानने उघडले “या” ऐतिहासिक गुरूद्वाराचे दरवाजे

परतीचा प्रवास करीत असताना छाओ साहिब गुरूद्वारा असलेल्या ठिकाणी आले.

१८३४ मध्ये महाराजा रणजित सिंग यांनी उभारलेला आणि फाळणीच्या वेळी बंद करण्यात आलेला ऐतिहासिक छाओ साहेब गुरूद्वारा पाकिस्तान सरकारने तब्बल ७२ वर्षांनंतर शुक्रवारी खुला केला. पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यात हा गुरूद्वारा असुन यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पाकिस्तानसह भारतीतील शिख बांधवही हजर होते.

पाकिस्तानातील गुरूद्वारा नानकाना साहिब येथुन सुरू झालेल्या नगर कीर्तन सोहळ्याच्या दोन दिवसानंतर हा गुरुद्वारा छाओ साहिब प्रवेशाचा कार्यक्रम झाला. नगर कीर्तनला शिख बांधव पंजाबमधील अतारी-वाघा बॉर्डरमार्गे भारतात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात सुखमनी साहिब यांचा पाठ आणि अरदास वाचनानंतर झाली. यावेळी लंगरचाही शुभारंभ करण्यात आला. उत्तरेकडे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ असलेल्या रोहताज किल्ल्याजवळ हा गुरूद्वारा आहे.

हा गुरूद्वारा ऐतिहासिक का?
शिख समुदायाची शिख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्याविषयी अगाध श्रद्धा आहे. गुरू नानकजी एकदा तिल्ला जोगियन मंदिरात नाथपंथीयांना भेटण्यासाठी गेले होते. तिथुन परतीचा प्रवास करीत असताना छाओ साहिब गुरूद्वारा असलेल्या ठिकाणी आले. त्यावेळी या परिसरात प्रचंड दुष्काळ पडलेला होता. लोकांना पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नव्हते. यावेळी गुरू नानक येथे थांबले आणि प्रार्थना केली. त्यानंतर पाण्याचे तुषार येथुन बाहेर पडले, अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे हा गुरूद्वारा शिख समुदायासाठी महत्त्वाचा मानला जातो.

७२ वर्षांपासुन दुर्लक्षित असलेला गुरूद्वारा अखेर पुन्हा सुरू झाला आहे. आजच्या सारखा दुसरा कुठला सुदिन नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष सतवंत सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसला दिली. आता या गुरूद्वाराचा जिर्णोद्धार करण्याची तयारी करणार आहोत. शांतता आणि बंधुभाव दृढ करीत गुरू नानकजी यांची ५५०वी जयंती साजरी करूया, असे आवाहनही त्यांनी भारतीयांना केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pakistan opens doors of historic choa sahib gurdwara after 72 years of partition bmh