Pakistan petrol crisis news : इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी पाकिस्तानच्या इंधन साठ्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘समा टीव्ही’च्या ‘नदीम मलिक लाईव्ह’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी इशारा दिला की, हे युद्ध लवकर संपताना दिसत नाहीये आणि यामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यांनी पाकिस्तानच्या मर्यादित धोरणात्मक साठ्यावर (Strategic Reserves) प्रकाश टाकला आणि तातडीने ‘ऊर्जा सुरक्षा नियोजना’ची गरज असल्याचं सांगितलं. एकीकडे पाकिस्तानने इराण आणि अमेरिकेतील संघर्ष संपवण्याकरता मध्यस्ती केलेली असताना त्यांच्याच देशात इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

पाकिस्तानमध्ये तेल आणि पेट्रोलचा मर्यादित साठा

मुलाखतीदरम्यान पेट्रोलियम मंत्र्यांनी खुलासा केला की, पाकिस्तानकडे सध्या कच्च्या तेलाचा केवळ ५ ते ७ दिवसांचा साठा उपलब्ध आहे. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, देशाकडे एका दिवसाचाही पेट्रोलचा साठा शिल्लक नाही, ज्यामुळे पाकिस्तानची ऊर्जा व्यवस्था अत्यंत संवेदनशील बनली आहे. त्यांच्या मते, ही परिस्थिती साठवणूक क्षमता वाढवण्याची आणि दीर्घकालीन ऊर्जा सज्जतेमध्ये सुधारणा करण्याची तातडीची गरज अधोरेखित करते. ते असंही म्हणाले की, आपल्याकडे भारतासारखं नाहीय की पेनाच्या एका सहीने आपल्याला ६० ते ७० दिवसांसाठी तेलाचा साठा मिळू शकेल.

जागतिक तेलाच्या किमतींबाबत चिंता

अली परवेझ मलिक यांनी सांगितले की, इतिहासात दुबई क्रूडच्या किमती कधीही १७० डॉलर्सपर्यंत पोहोचल्या नव्हत्या, जे जागतिक बाजारपेठेतील तीव्र अस्थिरतेचे लक्षण आहे. ते म्हणाले की, सरकार जनतेचे हाल कमी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि शक्य तिथे सबसिडी (अनुदान) देण्याचा प्रयत्न केला आहे. इराण-अमेरिका संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेमध्येही पेट्रोलची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

मंत्र्यांनी भर दिला की, जागतिक जोखीम लक्षात घेता पाकिस्तानने आपल्या ऊर्जा सज्जतेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेत डिझेलची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे त्याचे दर आणि पुरवठा खूप संवेदनशील आहे. त्यांनी असेही सांगितले की, ऊर्जा सुरक्षा सुधारण्यासाठी ३० दिवसांचा ‘क्रूड ऑईल प्रोग्राम’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.