Pakistan Petrol Price Hike latest updates amid Iran-Israel conflict: पश्चिम आशियातील युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक मंदावली आहे. यामुळे जगावर आता ऊर्जा संकट घोंघावत आहे. भारतात तेलाचा तुटवडा भासू नये, यासाठी काही दिवस रशियाकडून आयात केली जाणार आहे, अमेरिकेकडून यासाठी सूट मिळाली आहे. मात्र भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये मात्र तेलाच्या तुटवड्याचे संकट उभे राहिले आहे. एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान सरकारने शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर ५५ रुपयांची वाढ केली आहे.

इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोल ३२१ रुपये प्रतिलिटर आणि हाय-स्पीड डिझेल ३३६ रुपये प्रतिलिटरने महागले आहे. इराणमधील संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्यात खंड पडला असून कच्च्या तेलाच्या किमती दोन वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत.

पाकिस्तानकडे सध्या फक्त २८ दिवस पुरेल इतकाच पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे. कच्च्या तेलाचा साठा १० दिवस पुरेल इतका आहे. तर एलपीजीचा साठा १५ दिवसांचा आहे, असे पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी शुक्रवारी सांगितले होते.

करोना काळातील उपाययोजनांची पुनरावृत्ती

अनेक विकसनशील देशांप्रमाणेच पाकिस्तानलाही इंधनाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. सध्या पुरवठा खंडीत झाल्यामुळे त्यांना ऊर्जा धोरणाचा पुन्हा एकदा आढावा घ्यावा लागत आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इंधनाच्या किंमतीमध्ये साप्ताहिक सुधारणा करण्याच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिल्यानंतर पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी इंधन दर वाढीची घोषणा केली.

इंधनाचा वापर कमी करण्यासाठी करोना काळातील उपाययोजना पुन्हा लागू करण्याची योजना पाकिस्तान सरकार आखत आहे. तेल संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकार कंपन्यांना आठवड्यातून दोन दिवस घरून काम करणे आणि कार्यलयात केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनीच यावे, असे निर्देश देऊ शकते.

एक आठवड्यापासून इराणनजीक असलेली सामुद्रधुनी जवळपास वाहतुकीसाठी बंद आहे. या जलमार्गावरून जगभरातील तेल साठ्याचा २० टक्के भागाचा पुरवठा होत असतो.