Pakistan Petrol Diesel Price Hike Updates : अमेरिका-इराण युद्धाचा फटका आता जगातील अनेक देशांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम आशियातील या युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत होत आहे. यातच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाच्या वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्यामुळे जगावर ऊर्जा संकट घोंघावत आहे. भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये कच्च्या तेलाच्या तुटवड्याचं संकट उभं ठाकलं आहे.
अमेरिका-इराण युद्धाचा पाकिस्तानला मोठा फटका बसत आहे. यातच आता पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी गुरुवारी इंधनाच्या दरात मोठी दरवाढ करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर पाकिस्तानात आता पेट्रोल ४५० पाकिस्तानी रुपये (PKR) प्रति लिटर आणि डिझेल ५०० पाकिस्तानी रुपये (PKR) प्रति लिटरवर पोहोचलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारने गुरुवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १३७.२४ पाकिस्तानी रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर १८४.४९ पाकिस्तानी रुपये एवढी वाढ केली आहे. या दरवाढीच्या निर्णयामुळे पाकिस्तानात आता पेट्रोल प्रति लिटर ४५८.४ पाकिस्तानी रुपये आणि डिझेल प्रति लिटर ५२०.३५ पाकिस्तानी रुपयांवर पोहोचलं आहे. हे सुधारित दर शुक्रवारपासून लागू करण्याचे निर्देशही पाकिस्तान सरकारने दिले आहेत.
दरम्यान, केरोसीनच्या दरातही प्रति लिटर ३४.०८ पाकिस्तानी रुपयांची वाढ करण्यात आली असून आता पाकिस्तानात केरोसीनही ४५७.८० पाकिस्तानी रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. दरम्यान, अमेरिका-इराण युद्ध सुरू झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने सुरुवातीला ६ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ५५ पाकिस्तानी रुपयांनी दरवाढ केली होती. तसेच त्यानंतर ९ मार्च रोजी इंधनाबाबत काटकसर करण्यासाठी काही उपाययोजनाही जाहीर केल्या होत्या. मात्र, त्यानंतर आता पुन्हा एकदा इंधन दरवाढ करण्यात आली आहे.
