Pakistan Struggles In Balochistan: पाकिस्तानी लष्कराला सध्या त्यांच्याच देशातील बलुचिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. या हल्ल्यांना रोखण्यासाठी आणि प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून लष्कर तैनात करण्यात आले आहे. याबाबतची माहिती देताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, बलुचिस्तानच्या विशाल भूगोलामुळे बलुचिस्तानमध्ये तैनात असलेले सुरक्षा दलही अपुरे पडत आहे. यामुळे सुरक्षा दलाला शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याचे जाणवत आहे. तरीही हल्ले वाढत असताना सरकार मोठ्या प्रमाणात दहशतवादीविरोधी कारवाया सुरू ठेवत आहे, असे ख्वाजा आसिफ म्हणाले.

राष्ट्रीय सभेला संबोधित करत असताना आसिफ म्हणाले की, पाकिस्तानचा ४० टक्के भूभाग बलुचिस्तानने व्यापलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रदेशावर सैन्य तैनात करूनही पाकिस्तानी लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बलुचिस्तान हा भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानचा भाग असून तो ४० टक्क्यांहून अधिक मोठा आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे हे लोकवस्ती असलेल्या शहरांपेक्षा खूपच कठीण आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सैन्याची आवश्यकता आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रदेशावर पहारा देण्यासाठी ते शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

बलुचिस्तानमधील १२ ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईनंतर १७७ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पाकिस्तानला यश आले. गुन्हेगार आणि दहशतवाद्यांमध्ये संबंध असल्याचा आरोपही आसिफ यांनी केला. बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या नेतृत्वाखाली गुन्हेगारी टोळ्या कार्यरत असल्याचा दावाही ख्वाजा आसिफ यांनी केला.

भारतावरही केली टीका

संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ पुढे म्हणाले की, आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला खपवून घेणार नाही. त्याला असलेले वैचारिक अधिष्ठान तर अजिबात मान्य करत नाहीत. कारण हिंसाचाराला स्वातंत्र्य चळवळीचे स्वरूप दिले तरी तो हिंसाचारच असतो. यासाठी त्याला नाकारले गेले पाहिजे. गुन्हेगारी कृत्य झाकण्यासाठीच त्याला चळवळीचे रूप दिले जाते.

बलुचिस्तानमध्ये भारताच्या प्रॉक्सी कार्यरत असल्याचाही आरोप ख्वाजा आसिफ यांनी केला. तसेच अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर होत आहे, असेही ते म्हणाले. बलुचिस्तानमधील दहशतवाद्यांचे नेतृत्व अफगाणिस्तानातील असल्यामुळे त्यांना तिथून पाठिंबा मिळत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

बलुचिस्तानमध्ये प्रगतीचे वारे

बलुचिस्तान पिछाडीवर असल्याचा आरोपही ख्वाजा आसिफ यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, मागच्या काही वर्षात इथे चांगला विकास झाला आहे. पाकिस्तानच्या इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा इथे सर्वाधिक विमानतळ आहेत. जे एकेकाळी बंद होते, तिथेही उड्डाणे सुरू आहेत. तसेच बलुचिस्तानमधून लोक गायब होत असल्याचाही आरोप त्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, या यादीतील नावे मारले गेलेल्या दहशतवाद्यांची आहेत.