पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सातत्याने पाकव्याप्त काश्मीर आणि आपल्या देशातील जनतेची दिशाभूल करत आहेत. शुक्रवारी पीओकेमधील मुझफ्फराबादमध्ये इम्रान यांनी रॅली केली. काश्मीर आता आंतरराष्ट्रीय मुद्दा बनला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ५० वर्षात पहिल्यांदा काश्मीर मुद्दावर चर्चा झाली. ब्रिटनमधील खासदार आणि अमेरिकेतील सिनेटर्सनी काश्मीर मुद्दा उपस्थित केला आहे असे इम्रान म्हणाले.

वास्तविक संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानने काश्मीर प्रश्नावर भारताबरोबर चर्चा करुन मार्ग काढावा असे स्पष्ट केले आहे. अमेरिकेसह संयुक्त राष्ट्राने काश्मीर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे मान्य केले आहे. तरीही इम्रान खान सातत्याने आपल्या देशातील जनतेची दिशाभूल करत आहेत.

“भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. आरएसएस ही हिंदू कट्टरपंथीय संघटना आहे. ते मुस्लिम, ख्रिश्चन आणि सर्व अल्पसंख्यांकाचा द्वेष करतात” असे इम्रान म्हणाले. “आरएसएसचा हिंदू महानतेवर विश्वास असून शेकडो वर्ष मुस्लिमांनी भारतावर राज्य केले त्यामुळे ते मुस्लिमांचा द्वेष करतात. हिटलरच्या नाझी पक्षाच्या मार्गावरुन त्यांची वाटचाल सुरु आहे. त्यांनी सुद्धा अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले” असे इम्रान म्हणाले. “आरएसएसची स्थापना झाली तेव्हापासून त्यांना भारतात मुस्लिम नको होते आणि हे सर्व त्यांच्या योजनेनुसार चालू आहे” असा आरोप इम्रान यांनी केला.

भारताबरोबर अपघाताने युद्ध होऊ शकते
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जी परिस्थिती आहे. त्यामुळे भारताबरोबर अपघाती युद्धाची शक्यता नाकारता येत नाही असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे. युद्धाचे काय परिणाम आहेत याची भारत आणि पाकिस्तान दोघांना कल्पना आहे. पण सध्याची परिस्थिती कायम राहिली तर अपघाती युद्धाची शक्यता नाकारता येत नाही. काहीही घडू शकते असे कुरेशी बुधवारी जीनेव्हामध्ये संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

संयुक्त राष्ट्राचे मानवी हक्काचे उच्चायुक्त मिशेल बॅचलेट हे प्रदेशाला भेट देण्याचा विचार करत आहेत असे कुरेशी म्हणाले. जम्मू-काश्मीरमधल्या परिस्थितीची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी करणारे कुरेशी यांनी भारत आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या भागाला भेट देण्याचे निमंत्रण बॅचलेट यांना दिले आहे. मिशेल बॅचलेट यांनी दोन्ही बाजूंना भेट द्यावी. तिथली परिस्थिती पाहून रिपोर्ट तयार करावा. त्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे, सत्य काय ते जगाला समजू शकेल असे कुरेशी म्हणाले.