नव्या पाकिस्तानचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या इम्रान खान यांनी देशाला अधिक गरीब बनवले आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान इम्रान खान परदेशातून मिळालेल्या भेटवस्तू विकून आपली संपत्ती वाढवत आहेत. पाकिस्तानच्या मुख्य विरोधी पक्षांनी बुधवारी हा आरोप केला आहे. त्यामुळे परदेशातून मिळालेल्या भेटवस्तूंच्या प्रकरणात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अडकले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्या वस्तू विकून देशाच्या सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम यांनी परदेशी भेटवस्तूंवरून इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे आणि म्हटले आहे की, इम्रान खान यांनी भेटवस्तू लुटल्या आहेत.

पंतप्रधान इम्रान खान यांनी इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तू बेकायदेशीरपणे विकल्या, ज्यात एक दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या महागड्या घड्याळाचा समावेश आहे असे पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी म्हटले आहे. राष्ट्राचे प्रमुख आणि घटनात्मक पदांवर असलेले अधिकारी यांच्यात अधिकृत भेटींमध्ये भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाते. पाकिस्तानच्या गिफ्ट डिपॉझिटरीमधील नियमांनुसार, या भेटवस्तू राष्ट्राची मालमत्ता आहेत जोपर्यंत त्यांचा उघड लिलाव होत नाही. नियमांनुसार, अधिकारी १०,००० रुपयांच्या खालच्या किमतीच्या भेटवस्तू स्वतः जवळ ठेवू शकतात.

पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी उर्दूमध्ये यासंदर्भात ट्वीट केले आहे. “इम्रान खान यांनी इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तू विकल्या आहेत. एकीकडे इम्रान खान तोशाखानाच्या भेटवस्तू लुटल्या आणि तुम्ही मदिना सारखे राज्य स्थापन करण्याची चर्चा करता? एखादी व्यक्ती इतकी असंवेदनशील, बहिरा, मूक आणि आंधळी कशी असू शकते?, असे मरियम नवाज यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्ष पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (PDM) चे प्रमुख मौलाना फजलूर रहमान यांनीही इम्रान खान यांच्यावर आरोप केले आहेत. “पंतप्रधान इम्रान खान यांनी एका राजकुमाराकडून महागडे घड्याळ विकल्याच्या बातम्या आहेत. हे लाजीरवाणे आहे. सोशल मीडियावर अशा बातम्या येत आहेत की इम्रान खान यांना एका आखाती देशाच्या राजपुत्राने दहा लाख अमेरिकन डॉलर्सचे घड्याळ भेट दिले होते. हे घड्याळ दुबईमध्ये इम्रान खानच्या एका जवळच्या मित्राने दहा लाख डॉलर्सला विकत घेतले आणि ते पैसे इम्रान खानला दिले. भेटवस्तूंच्या विक्रीबद्दल राजाला कळले आहे, असे मौलाना फजलूर रहमान असे म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तान सरकारने या प्रकरणाला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सरकारने असा युक्तिवाद केला की पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचे तपशील वर्गीकृत म्हणून केले गेले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan pm imran khan selling gifts received from other countries heads abn
First published on: 21-10-2021 at 15:33 IST