Shehbaz Sharif on Brahmos Attack : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगलेच तणावाचे बनले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पीओके येथील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. दरम्यान यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी कबूल केले आहे की, भारताने ९-१० मे च्या मध्यरा‍त्री जेव्हा रावळपिंडीतील विमानतळ आणि प्रमुख लष्करी तळांवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रे डागली तेव्हा याबद्दल पाकिस्तानी सैन्याला कसलीही कल्पना नव्हती.

अझरबैजान येथे एका कार्यक्रमात बोलताना शरीफ म्हणाले की, असिम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली लष्कराने भारतावर १० मे रोजी सकाळच्या नमाजानंतर हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र पहाट होण्याच्या आधीच लांब पल्ल्याची सुपरसॉनिक ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे पाकिस्तानच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये डागण्यात आली. आता फील्ड मार्शल या पदावर बढती देण्यात आलेले असिम मुनीर यांनी त्यांना या पहाटेच्या हल्ल्याबद्दल माहिती दिली, असेही शरीफ म्हणाले. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

“९-१० मे रोजी रात्री आम्ही भारताच्या आक्रमकतेला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. आमचे लष्कर पहाटे ४.३० वाजता फजरच्या प्रार्थनेनंतर धडा शिकवण्यासाठी सज्ज होते. पण ती वेळ येण्याच्या आधीच भारताने पुन्हा एकदा ब्राह्मोसच्या मदतीने क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यामध्ये पाकिस्तानातील वेगवेगळ्या प्रांतांसह रावळपिंडी येथील विमानतळाला लक्ष्य करण्यात आले,” असे शरीफ त्यांच्या लाचिन येथील भाषणात म्हणाले.

पाकिस्तानने सीमेवरील नागरी वसाहतींमध्ये केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना उत्तर देताना भारताने रावळपिंडी येथील नूर खान एअरबेस आणि यासह ११ लष्करी तळांना लक्ष्य केले होते.

नूर खान एअरबेसबरोबरच भारताने राफिकी, मुरिद, रहिम यार खान, सुक्कूर आणि चुनियान येथील पाकिस्तानी लष्करी तळांना देखील लक्ष्य केले. स्कार्दु, भोलारी, जाकोबाबबाद आणि सारगोधा येथे देखील मोठे नुकसान झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार भारताने Su-30MKI या लढाऊ विमानातुन सुमारे १५ ब्राम्होस क्षेपणास्त्रे डागली होती. ‘फायर अँड फोरगेट’ क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या हवाई संरक्षण प्रणालीला भेदले आणि एअर बेसना लक्ष्य केले . रशियाच्या सहकार्याने बनवलेले हे क्षेपणास्त्र ३०० किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकतात.